
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ऑक्टोबर हिटचा प्रचंड त्रास
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ऑक्टोबर हिटचा प्रचंड त्रास जाणवू लागला असून, तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेचा पारा ३४ ते ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने पंखे, एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढलेल्या वापरामुळे जिल्ह्याची विजेची नेहमीची मागणी १६० मेगावॉटवरून थेट १८० मेगावॉटवर पोहोचली आहे.
विजेच्या या अचानक वाढलेल्या मागणीमुळे महावितरणसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यभरातच मागणी वाढल्यामुळे वीज निर्मिती आणि मागणीमध्ये तफावत निर्माण होत आहे. परिणामी, काही भागात तात्पुरता वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महावितरणचे तांत्रिक पथक सतत कार्यरत असून जिल्ह्यात कोणतेही अधिकृत भारनियमन लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकीकडे विजेची मागणी वाढ़त असताना दुसरीकडे महावितरणसमोर थकबाकीचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे. महावितरणची दरमहा वीजबिल मागणी सुमारे १४० कोटी रुपये आहे. मात्र, ग्राहकांकडे अजूनही तब्बल ३८ कोटी रुपयांची थकबाकी अडकून पडली आहे. यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमधील स्ट्रीटलाईट्सची ७ कोटी ३९ लाख रुपये, तर विविध सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांची ४ कोटी २१ लाख रुपयांची थकबाकी समाविष्ट आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये आणि प्रशासकीय संस्थांकडील थकबाकीचा आकडा देखील ५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. जिल्ह्यात महावितरणचे एकूण ६ लाख १० हजार ग्राहक आहेत. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणच्या महसुलावर आणि आर्थिक नियोजनावर मोठा ताण येत आहे.
अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी महावितरण प्रशासनाने नागरिकांना आणि संबंधित विभागांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सर्व थकबाकीदार ग्राहकांना त्यांची थकीत वीजबिले लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून वीज यंत्रणा सुरळीतपणे चालवता येईल.




