
रत्नागिरीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांना वाचन प्रेरणा सन्मान पुरस्कार जाहीर ,२५ ऑक्टोबरला मुंबईत होणार कार्यक्रम
मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ‘वाचन प्रेरणा सन्मान २०२६’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांना वाचन प्रेरणा सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
वाचन संस्कृतीचा प्रसार, ग्रंथालयांची समृद्धी, ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत पुस्तकांची उपलब्धता तसेच नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्तरांवर कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानाची दखल या सन्मानाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
या उपक्रमातून वाचन संस्कार रुजविण्यासाठी आणि समाजामध्ये वाचन चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सन्मानाबद्दल भाषा संचालनालयाच्या वतीने संबंधितांना अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. नितीन रिंढे यांचे ‘महात्मा फुले यांचे साहित्य व विचार आणि आजची युवा पिढी’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येणार आहे.
भाषा संचालनालयाचे भाषा संचालक अरुण गीते यांनी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार असून, भावी पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या चळवळीला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




