
जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक : जलस्रोत बळकटीकरण, शाळा दुरुस्ती आणि वीज यंत्रणा सक्षमीकरणावर भर भूजल पातळी वाढीसाठी ४३ गावांमध्ये सिमेंट बंधारे व नाला खोलीकरण प्रस्ताव द्यावेत : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. १३ ) : जिल्ह्यातील जलस्रोत अधिक बळकट करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सुचविलेल्या ४३ गावांमध्ये सिमेंट नालाबांध तसेच आवश्यक तेथे नाला खोलीकरणाची कामे हाती घ्यावीत; यासाठी जल व मृदसंधारण विभागाने तातडीने सर्वेक्षण करून सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जल व मृदसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे तसेच उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे योजनांची माहिती दिली.
शाळा, अंगणवाड्या व रुग्णालयांची दुरुस्ती प्राधान्याने करा
नागरिकांच्या थेट हिताशी निगडित असलेल्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर विशेष भर देण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, शासकीय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीचे प्रस्ताव आरोग्य विभागाने तातडीने द्यावेत. शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळा तर संबंधित विभागाने शासकीय निवासी शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या, आयटीआय आणि शासकीय महाविद्यालयांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन येत्या १५ दिवसांत ती अंतिम करावीत व तसे प्रस्ताव सादर करावेत.
डोंगरांवरील गवताचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर
जिल्ह्यातील शासकीय व खासगी जमिनींवर, विशेषतः डोंगराळ भागांत मुबलक प्रमाणात उगवणाऱ्या गवताचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी व्हावा, या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने वनविभागाच्या समन्वयाने ठोस नियोजन करावे आणि वैरण विकास योजनेचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वीज वितरण यंत्रणा बळकट करण्यावर भर; पोलिसांसाठी ‘डॉग व्हॅन’
ग्रामीण भागातील विद्युतीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प आणि स्मशानभूमी दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महावितरणने ओव्हरलोडिंग व तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नवी वितरण रोहित्रे (DP) खरेदी करावीत आणि कृषी वाहिनीवरील घरगुती ग्राहकांसाठी गरजेनुसार ‘स्पेशल डिझाईन’ रोहित्रे बसवून वीज यंत्रणा अधिक सक्षम करावी, असेही ते म्हणाले. याशिवाय, पुण्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी सुसज्ज ‘डॉग व्हॅन’ तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.




