
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अधिवास दिन २०२६ कार्यक्रमात मिलिंद कीर आणि ज्योतिप्रभा पाटील यांचा सहभाग
मस्कत, ओमान येथे ‘सर्वांसाठी योग्य निवासव्यवस्था’ या जागतिक विषयावर चर्चा; जलसुरक्षा आणि शाश्वत नागरी विकासाच्या मुद्द्यांमध्ये विशेष रस

रत्नागिरी,१३ ऑक्टोबर २०२६ : रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. मिलिंद कीर आणि २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केलेले श्री. ज्योतिप्रभा प्रभाकर पाटील यांनी ओमानची राजधानी मस्कत येथे आयोजित World Habitat Day 2026 अर्थात जागतिक अधिवास दिन २०२६ कार्यक्रमात सहभाग घेतला.
५ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य विषय “Adequate Housing for All” — सर्वांसाठी पुरेशी आणि योग्य निवासव्यवस्था हा होता. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी वसाहती कार्यक्रमाच्या (UN-Habitat) सहकार्याने आणि ओमानच्या सल्तनतीच्या यजमानपदाखाली आयोजित या जागतिक उपक्रमात परवडणारी घरे, सुरक्षित वसाहती, शाश्वत शहरी विकास आणि नागरी जीवनमान यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर भर देण्यात आला.
या कार्यक्रमात सहभागी होताना मिलिंद कीर आणि ज्योतिप्रभा पाटील यांनी विशेषतः जलसुरक्षा, शहरी पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि शहरांच्या दीर्घकालीन पायाभूत गरजा यांसारख्या विषयांमध्ये होत असलेल्या प्रगती वर अभ्यास केला. कोकणातील नागरी भागांसमोरील पाणीपुरवठ्याची आव्हाने, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि हवामान बदलांमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा चर्चांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विशेष महत्त्व आहे.
UN-Habitat च्या धोरणात्मक प्राधान्यांशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमात सर्वांसाठी योग्य निवासव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी शासनाच्या विविध स्तरांतील समन्वय, प्रभावी नागरी नियोजन आणि शाश्वत विकासाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच, सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी युक्त वसाहती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक धोरणे, गुंतवणूक आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे संकल्पनापत्रात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर विकसित होत असलेल्या शहरी धोरणांचा अभ्यास करून त्यांचा रत्नागिरीच्या नागरी विकासासाठी, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी आणि अधिक हवामान-सक्षम शहरनिर्मितीसाठी उपयोग कसा करता येईल, या दृष्टीने या सहभागाला महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाविषयी: जागतिक अधिवास दिन हा शहरीकरण, निवासव्यवस्था आणि सर्वांसाठी सुरक्षित व योग्य घरे उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणारा उपक्रम आहे. २०२६ मधील कार्यक्रमाचा भर प्रत्येक व्यक्तीला योग्य निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक धोरणे, सहकार्य आणि कृती यांवर होता.
संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat च्या कार्यकारी संचालक अनाक्लॉडिया रॉसबाख तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांचे नागरी विकास मंत्री या शिखर परिषदेला उपस्थित होते. या शिखर परिषदेत पुरेशा आणि सन्मानजनक निवासस्थानासाठी आवश्यक असलेल्या सात निकषांचा पुनरुच्चार करण्यात आला.
हे सात निकष म्हणजे निवासहक्काची सुरक्षितता, सेवा, बांधकाम साहित्य, सुविधा आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता, परवडणारी किंमत, निवासयोग्यता, सुलभ उपलब्धता, योग्य स्थान आणि सांस्कृतिक अनुरूपता हे होत.




