
रेल्वे स्थानकांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. किरण सामंत सरसावले!
राजापूर रोड, सौंदळ आणि विलवडे स्थानकांना देणार भेट; दहा दिवसांत रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक
राजापूर, : राजापूर तालुक्यातील राजापूर रोड व सौंदळ आणि लांजा तालुक्यातील विलवडे या रेल्वे स्थानकांवरील विविध समस्या, प्रवाशांच्या अडचणी आणि प्रलंबित मागण्यांची आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी दखल घेतली आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक मंडळे, प्रवासी संघटना आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत दहा दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानकांवरील समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जाणार आहेत.
राजापूर तालुक्यात राजापूर रोड आणि सौंदळ ही दोन रेल्वे स्थानके आहेत. तर राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेले विलवडे रेल्वे स्थानक लांजा तालुक्यात आहे. या तिन्ही स्थानकांवर प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, आवश्यक सेवा-सुविधांचा अभाव आणि काही रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, अशा मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.
स्थानकांवरील गैरसोयी आणि प्रवाशांच्या अडचणींबाबत लक्ष वेधण्यात आल्यानंतर आमदार किरण सामंत यांनी या प्रश्नांची गंभीर दखल घेतली आहे. केवळ निवेदनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्थानकांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
या भेटीदरम्यान रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत स्थानिक मंडळे, प्रवासी संघटना आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. यामध्ये स्थानकांवरील आवश्यक सुविधांची उपलब्धता, प्रवाशांच्या अडचणी, प्रलंबित मागण्या आणि रेल्वे गाड्यांच्या थांब्यांसंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
आमदार सामंत यांच्या या पुढाकारामुळे राजापूर रोड, सौंदळ आणि विलवडे रेल्वे स्थानकांवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबाबत प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता दहा दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.



