
कापड व्यावसायिक अपहरण सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला वेग
रत्नागिरी शहरातून बेपत्ता झालेल्या ५३ वर्षीय कापड व्यावसायिक सज्जन अमरचंद ओसवाल यांच्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते रेल्वे स्थानक, माळ नाका आणि जयस्तंभपरिसरात दिसल्याचे समोर आले असून, सायंकाळी सहा वाजता सुटलेल्या एस्टी बसमधून ते प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध अधिक तीव्र केला आहे.
पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलीस हवालदार भाऊ पाटील यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची कसून पाहाणी केली असता, त्यात सज्जन ओसवाल हे विविध महत्त्वाच्या ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या बसमधून ते बाहेर गेल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस हवालदार भाऊ पाटील यांनी प्रत्यक्ष रत्नागिरी एस्टी डेपो, कोल्हापूर एस्टी डेपो तसेच रेल्वे स्थानकावर जाऊन संबंधित बसचे चालक आणि वाहक यांच्याकडे सखोल चौकशी केली आहे. प्रवाशांची ये-जा आणि बसमधील संशयित हालचालींची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
आठवडा बाजार परिसरातील यश ट्रेडर्स दुकानातून चुलतभाऊ निर्मल ओसवाल यांना भेटण्यासाठी निघालेले सज्जन ओसवाल अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि व्यापार्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस विविध तांत्रिक पुराव्यांच्या आणि सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा माग काढत आहेत. व्यावसायिक सुखरूप परत यावेत यासाठी पोलिसांचे पथक सर्व, शक्य त्या कोपर्यात कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.




