
मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू : दुसरा गंभीर जखमी
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा जीवघेणा ठरला असून, संगमेश्वर तालुक्यातील तुरळ परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाला प्राण गमवावे लागले, तर त्याच्यासोबत प्रवास करणारा मित्र गंभीर जखमी झाला आहे. अनिकेत नारायण लाड (वय ३०, मूळ रा. येरडव,सावंतवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, सचिन शांताराम गुरव (वय ४१, रा. निगुडवाडी, ता. संगमेश्वर) हे या अपघातात जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्थापनेचा सण आपल्या गावात साजरा करण्यासाठी अनिकेत लाड आणि सचिन गुरव हे दोघे शनिवारी रात्री मुंबईतील भोईवाडा येथून दुचाकीने निगुडवाडीच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांचा प्रवास सुरू असतानाच रविवारी सकाळी तुरळ परिसरात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. महामार्गावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, दोघेही दुचाकीवरून फेकले गेले.
या अपघातात अनिकेत यांच्या डोक्यासह हातापायांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली. घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दुसरीकडे, सचिन गुरव यांनाही गंभीर दुखापत झाली असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विवेक साळवी, पोलीस उपनिरीक्षक महाजन आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, रस्त्याची सुरक्षितता आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




