रत्नागिरीत २९ ऑक्टोबरला ‘शाश्वत पाणी परिषदे’ चे आयोजन- राजू भाटलेकर

भविष्यातील पाणीटंचाईवर होणार मंथन

रत्नागिरी: हवामान बदलामुळे उद्भवणारे अल् निनो जलसंकट आणि भविष्यात जाणवणारी पाणीटंचाई यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि हिरवळ प्रतिष्ठान यांच्या वतीने, तसेच जलप्रेमी व जलदूत जलसेवकांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

परिषद दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत जिल्हा नियोजन हॉलमध्ये पार पडणार आहे. या शाश्वत पाणी परिषदेला पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, सर्व आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना आखणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणे, तलाव आणि विहिरींमधील पाणीपातळीत होणारी घट लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, रुग्णालये व सार्वजनिक संस्था, पशुधन, घरगुती वापर, शेती आणि उद्योग या क्रमाने पाणीवाटप निश्चित केले पाहिजे.

ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर पाणी वापराबाबत कडक नियम तयार करणे, गळती रोखणे आणि जनजागृती केली पाहिजे. औद्योगिक पाण्याचा पुनर्वापर, आधुनिक सिंचन तंत्रज्ञान (ठिबक व तुषार सिंचन) आणि भूजलाचा अमर्याद उपसा रोखला पाहिजे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर व अनधिकृत जोडण्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि डिजिटल/नोंद आधारित पाणीपुरवठा व्यवस्थापन लागू केले पाहिजे. या दृष्टीने परिषदेने विचारमंथन केले जाणार आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, ग्रामसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि जलप्रेमींनी या परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन राजू भाटलेकर, जलप्रेमी शहानवाज शाह, रोहन इंगळे, युयूत्सू आर्ते, महेश गर्दे, सुहास ठाकुरदेसाई, संजय वैशंपायन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button