पाण्यावर चालणारी भारताची पहिली हायड्रोजन शेगडी; किंमत किती आणि कशी करते काम?

Hydrogen Stove India Price and LPG alternative working mechanism explained : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील ३३ वर्षीय विकाश कुमार अशा घरात लहानाचे मोठे झाले, जिथं स्वयंपाक करणं ही फारच त्रासदायक प्रक्रिया होती.

कधी त्यांना लाकूडफाटा आणायला जावं लागायचं, कधी गोवऱ्या थापाव्या लागायच्या, तर कधी गॅस सिलेंडरसाठी वणवण करावी लागायची. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे एलपीजीचा तुटवडा जाणवू लागल्यावर तर त्यांच्या अडचणी कैकपटीने वाढल्या. त्यावेळी एकेका सिलेंडरसाठी त्यांनी चक्क ८ हजार रुपये मोजलेत.

ते म्हणतात,

“आम्हाला सिलेंडरसाठी तासनतास रांगेत थांबावं लागायचं. त्यावर उपाय शोधण्यासाठी मी असा विचार केला की, एकदाच काहीतरी गुंतवणूक अशी करायची ज्यामुळे पुन्हा दर महिन्याला असं रांगेत उभं राहण्याची वेळच येणार नाही.”

त्याचवेळी त्यांना इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर काही हायड्रोजन शेगड्यांची माहिती मिळाली. या शेगड्या फरीदाबादमधल्या एका कंपनीने अत्याधुनिक हरित तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्या होत्या. प्रदूषणमुक्तीसाठी कार्बनच्या वापरावर नियंत्रण ठेवणं हे या कंपनीचं ध्येय आहे. ही शेगडी साध्या पाण्यातल्या H2Oचे विघटन करून त्यापासून हायड्रोजन इंधन बनवते, ज्याचा वापर रोजच्या स्वयंपाकासाठी केला जाऊ शकतो.

विश्वात विपुल प्रमाणात आढळणारं हायड्रोजन अधिक चांगल्या प्रकारे कसं वापरता येईल, यासाठी होत असलेल्या अगणित प्रयोगांपैकी एक प्रयोग म्हणजे ही शेगडी. सद्यस्थितीतलं हवामानबदलाचं संकट आणि प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांच्या मर्यादा लक्षात घेता, हायड्रोजन हा पारंपरिक जैविक इंधनाला एक उत्तम आणि स्वच्छ पर्याय ठरू शकतो अशी कंपन्यांना खात्री आहे. त्यातच पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे गॅसचे भाव गगनाला भिडल्याने हायड्रोजनच्या या पर्यायाला अधिकच महत्त्व आले आहे. विकाशसारख्या कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. भारताला जवळपास ६०% एलपीजी पुरवठा आयात करावा लागतो, ज्यातला ९०% पुरवठा हा होर्मुझच्या खाडीतून केला जातो. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे भारताला होणाऱ्या एलपीजी पुरवठ्याला इतका गंभीर फटका बसला आहे की भारताची मासिक आयात दरमहा वीस लाख टनांवरून १० लाख टनांपेक्षा कमी झाली आहे, ही घसरण ५० टक्क्यांहून अधिक आहे.

जगभरात अंदाजे २१० कोटी लोक आजही स्वयंपाकासाठी बायोमास, कोळसा किंवा केरोसीन वापरतात. यांच्या वापराचे आरोग्यावर, विशेषतः महिला आणि मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अधिक गंभीर आहेत. एलपीजी हा अशा पर्यायांपेक्षा शुद्ध पर्याय मानला जात असला, तरी त्यावर जैविक इंधन पुरवठा साखळी आणि बदलत्या किमतीचा प्रभाव आहे. त्या तुलनेत हायड्रोजन वापरून होणाऱ्या स्वयंपाकात केवळ पाण्याच्या वाफेचाच वापर इंधन म्हणून होतोय, त्यामुळे घरात स्वयंपाकाच्या धुरामुळे होणारं वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन नाहीसं होतंय. त्याबरोबरच हायड्रोजनचा स्रोत हा अपारंपरिक (अक्षय्य) आहे, ही यातली आणखी एक जमेची बाजू आहे. या क्षेत्रात उतरू पाहणाऱ्या कंपन्यांसाठी जितक्या संधी उपलब्ध आहेत, तितकीच आव्हानंही त्यांच्यासमोर आ वासून उभी आहेत. मे २०२६ मध्ये रॉटरडॅम येथे झालेल्या ‘वर्ल्ड हायड्रोजन समिट’मध्ये व्हिजन मॅकेट्रॉनिक्स या भारतीय डीप टेक कंपनीने नेदरलँड्स-स्थित हायकूकर बीव्ही या कंपनीसोबत एक मोठा भागीदारीचा करार केला आहे. या करारानुसार, ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत भारताला या शेगड्यांच्या उत्पादनाचं प्रमुख केंद्र बनवलं जाईल. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून शेगडीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणं, हा या भागीदारीचा आणखी एक उद्देश आहे.

आयआयटी मुंबईच्या ‘ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी’ विभागाचे प्राध्यापक प्रकाशचंद्र घोष हेदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहेत. पवईतल्या ‘झेस्ट क्लीन पॉवर’ या कंपनीसोबत मिळून ते ही हायड्रोजन शेगडी थेट खेड्यापाड्यांत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. यासाठी त्यांनी स्वतः विकसित केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर केलाय. जर्मनीतून हायड्रोजन तंत्रज्ञानात पीएचडी मिळवलेले आणि या क्षेत्रात दोन दशकांचा दांडगा अनुभव असणारे प्रा. घोष हे सामुदायिक स्तरावर चालू शकेल अशा प्रकारची हायड्रोजन-आधारित स्वयंपाक यंत्रणा तयार करतायत. त्यासाठी ते अल्कालाईन इलेक्ट्रोलायसिसच्या प्रक्रियेचा वापर करतायत.

प्रा. घोष सांगतात,

“पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या काळात आम्ही आयआयटी मुंबईत २५ किलोवॅटचा सौरऊर्जेवर चालणारा ग्रीन हायड्रोजन निर्मितीप्रकल्प उभारून दाखवला. या प्रकल्पातून रोज अडीच ते तीन किलो हायड्रोजन तयार करून २०० ते २५० लोकांचा स्वयंपाक सहज करता येत होता. आमच्या कँटीनमधलं जेवणही याच यंत्रणेवर बनवलं गेलं. धोरणात्मक दृष्टीने विचार केला तर हे तंत्रज्ञान परकीय इंधनावरचं आपलं अवलंबित्व कमी करून देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करतं. आमच्या संशोधनानुसार, या तंत्रज्ञानामुळे घरातल्या स्वयंपाकाच्या धुरामुळे होणारं वायू प्रदूषण नाहीसं होतं, स्वयंपाकघरात नेहमी जाणवणाऱ्या उष्णतेचा त्रास कमी होतो आणि एक प्रकारे स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित व्हायलाही मदत होतेय.”

ग्राहकांच्या मते, सध्या ही शेगडी थोडी महाग वाटत असली तरी ती फायद्याचा सौदा ठरते. विकाश यांनी काही महिन्यांपूर्वी ‘ग्रीनव्हाईज’ कंपनीची दोन बर्नरची घरगुती शेगडी विकत घेतली. त्यांनाही हा सौदा फायद्याचा वाटला. ते म्हणतात, “ही शेगडी वापरायला अतिशय साधी आणि सोपी आहे. आकाराने मोठी नसल्याने जागेची अडचण येत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गॅस संपेल किंवा स्वयंपाक करणं महाग होईल, याची कोणतीही धाकधूक आता मनामध्ये उरलेली नाही.”

ही शेगडी कशी काम करते?

हायड्रोजन हा निसर्गात सर्वांत जास्त आढळणारा घटक असला तरी पृथ्वीवर तो एकटा नसतो; तो इतर अणूंसोबत, प्रामुख्याने पाण्याच्या रूपात बांधलेला असतो. हायड्रोजन हा थेट ऊर्जेचा स्रोत नसून ऊर्जेचा वाहक आहे; म्हणजेच तो निर्माण करावा लागतो. अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून जेव्हा हायड्रोजन तयार केला जातो, तेव्हा त्याला ‘ग्रीन हायड्रोजन’ म्हणतात. तो जळल्यानंतर त्यातून फक्त पाण्याची वाफच बाहेर पडते. नेमक्या याच तंत्रज्ञानाचा वापर ‘ग्रीनव्हाइज’ने आपल्या शेगडीत केलाय. ही शेगडी जागेवरच हायड्रोजन तयार करते. मेकॅनिकल इंजिनिअर असलेले आणि डिझाईन इंजिनिअरींगमध्ये एम. टेक केलेले कंपनीचे सहसंस्थापक संजीव कुमार सांगतात की, त्यांनी पारंपरिक गॅसला पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यास सुरुवात केली आणि त्यांचा हा शोध हायड्रोजनवर येऊन थांबला.

त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले,

“सध्या आपण एलपीजी, जैविक इंधनं आणि आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. आम्ही यासाठी बराच काळ पर्यायी व्यवस्था शोधण्यात घालवला. दोन वर्षांपूर्वी, कसल्याही प्रकारची आयात न करता परदेशी देशांवर असलेलं आपलं अवलंबित्व कसं संपवता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही विचार करू लागलो. आम्हाला एक अशी हायड्रोजन-आधारित प्रणाली बनवायची होती, जी सहज वापरण्याजोगी असेल आणि त्यासाठी आम्हाला बाहेरून काही वेगळं सामान आणायची गरज पडणार नाही.”

ही यंत्रणा वापरायला सहजसोपी आहे. शेगडीच्या आतल्या टाकीत पाणी ओतायचं. या टाकीतलं प्रोटॉन एक्स्चेंज मेम्ब्रेन (पीईएम) इलेक्ट्रोलायझर हे यंत्र विजेच्या सहाय्याने पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं विभाजन करतं. त्यानंतर हा हायड्रोजन थेट बर्नरवर येण्याआधी सुरक्षित चाळण्यांच्या मार्गाने प्रवास करतो. या मार्गात एक बबलर, एक बफर टँक आणि एक फ्लेम बॅक अरेस्टर असतो. बर्नरवर आल्यानंतर तो पेट घेतो आणि त्यातून स्वच्छ, निळीशार ज्योत दिसते. या शेगडीच्या पोटात असलेली इलेक्ट्रोलायसिसची यंत्रणा ६२ ते ८६ टक्के कार्यक्षमतेने चालते. पीईएम इलेक्ट्रोलायझर हा पाण्याचं विभाजन करण्यासाठी एका पॉलीमर मेम्ब्रेनचा वापर करतो. ही यंत्रणा आकाराने लहान असून विजेच्या चढ-उतारातही व्यवस्थित काम करते, फक्त यासाठी शुद्ध पाण्याची गरज भासते. शेगडीचे बटण चालू केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांत हायड्रोजन तयार होऊन शेगडी पेट घेण्यासाठी सज्ज होते.

संजीव सांगतात, “या प्रक्रियेत हायड्रोजनच्या जळणानंतर केवळ पाण्याची वाफ उरते. त्याचबरोबर, यातून बाहेर पडणारा ऑक्सिजन घरातली हवा अधिक शुद्ध ठेवण्यास मदत करतो.” कंपनीने याव्यतिरिक्त हायड्रोऑक्सी आणि अल्कालाईन इलेक्ट्रोलायझरसारखी इतरही काही तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्स बाजारात आणली आहेत. संजीव यांना अशी कंपनी सुरू करण्याची कल्पना २०२४ मध्ये सुचली होती. पण, हायड्रोजनच का? यावर बोलताना संजीव त्याच्या गुणवैविध्यावर भर देतात.

ते म्हणतात,

“हायड्रोजनचं महत्त्व केवळ शुद्ध ऊर्जेच्या संकल्पनेपुरतं मर्यादित न ठेवता, तो रोजच्या कामासाठी ऊर्जा म्हणून कसा वापरता येईल याचा विचार आम्ही केला. घरचा स्वयंपाक आणि कारखान्यातल्या भट्टीत आजही एलपीजी, पीएनजी आणि इतर पारंपरिक इंधनांचाच वापर होतो. मग हायड्रोजनसारखे स्वच्छ इंधन इथं वापरता येण्याची शक्यता प्रबळ असतानाही, तो वापर फक्त मोठमोठे कारखाने, प्रयोगशाळा किंवा वाहनांपुरताच का मर्यादित ठेवायचा?”

ही शेगडी आजघडीला काहीशी महाग आहे. ३ लिटरच्या टाकीसह येणाऱ्या घरगुती वापरासाठीच्या एक बर्नर असलेल्या शेगडीची किंमत १ लाख ५ हजार रुपये इतकी असून, दोन बर्नर हवे असल्यास हीच शेगडी दीड लाखाला विकली जाते. व्यावसायिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या शेगडीची किंमत साडेतीन लाख रुपये इतकी आहे. विकाशसारख्या सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी ३ लिटर टाकीची शेगडी महिनाभर पुरते. या शेगडीमुळे वर्षाला सुमारे ३ टन कार्बन उत्सर्जन टळतं आणि अतिरिक्त हायड्रोजन साठा किंवा सिलेंडरची गरजही संपते, असा ‘ग्रीनव्हाईज’चा दावा आहे. कंपनीची अधिकृत नोंदणी जानेवारी २०२५ मध्ये झाली. दोन वर्षांच्या सखोल सुरक्षा चाचण्यांनंतर, मार्च २०२६ मध्ये कंपनीने आपली पहिली शेगडी भारतीय लष्कराला विकली. जम्मूमधल्या उंचावरील भागात लष्कर आमची शेगडी वापरतंय असं संजीव सांगतात. शेगड्यांव्यतिरिक्त ही कंपनी हायड्रोजन डीस्पेन्सर्स, फ्युएल सेल, बायोमास पॉवर प्लांट प्रकल्प, प्रेशर स्विंग अब्झॉर्प्शन ऑक्सिजन-नायट्रोजन जनरेटर्सही विकते.

हायड्रोजन शेगडीचं भवितव्य काय?

‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन’अंतर्गत, भारताने २०३० पर्यंत ५० लाख टन हरित हायड्रोजन तयार करण्याचं, १० ते १०० गिगावॉट इलेक्ट्रोलायझर क्षमता उभारण्याचं आणि ५ लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. यासाठी केंद्राने २०३० पर्यंत १७,४९० कोटी रुपयांची तरतूद केलीय. ग्रीनव्हाइजने बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रँट या योजनेसाठी अर्जही केलाय. ही योजना नव्या स्टार्टअप्सना संशोधनासाठी मदत करते. यातून कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होईल असा संजीव यांना विश्वास आहे.

“आम्हाला ही शेगडी एआय आणि स्मार्ट टेक वापरून स्मार्ट बनवायची आहे, त्यामुळे ही शेगडी तुम्ही वाय-फायला जोडू शकता, मोबाईल ॲपने कंट्रोल करू शकता आणि तोंडी सूचना देऊनही वापरू शकतास,” असे ते सांगतात.

ऑगस्टमध्ये भारतीय मानक ब्युरो आणि स्टँडर्ड्स ऑस्ट्रेलिया या संस्थांनी ‘ऑस्ट्रेलिया-इंडिया स्टँडर्ड्स ट्रेड एनेबलिंग प्रोजेक्ट’अंतर्गत एकत्र भरवलेल्या कार्यशाळेत ग्रीनव्हाईजच्या हायड्रोजन शेगडीला केस स्टडी म्हणून सादर करण्यात आलं. कंपनी आता मालदीवपासून सुरुवात करत इतर देशांमध्येही या शेगड्या विकण्याच्या तयारीत आहे. संजीव पुढे सांगतात, “सध्या तरी अडचणी आहेत, त्यात सगळ्यात मोठी म्हणजे किंमत.” संजीवला याची कल्पना आहे, पण यातून काहीतरी मार्ग निघेल असाही त्यांना विश्वास आहे. “एखादी गोष्ट खास असेल तर ती महाग असतेच. ती सगळ्यांपर्यंत पोहोचवली की आपोआप स्वस्त होते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं की आम्ही ती किंमत नक्कीच कमी करू शकू,” असे ते म्हणतात.

शिवाय दुरुस्ती आणि बदलीच्या प्रक्रियेचा खर्च आहेच. सध्या जरी मर्यदित उत्पादनामुळे हा खर्च छोटा वाटत असला, तरी त्या उत्पादनांच्या दीर्घकालीन वापराबद्दलची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही. मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी अजून खूप पल्ला गाठायचाय हे संजीवला माहीत आहे. “कंपनी अजून नफ्यात आलेली नाही,” ते कबूल करतात. “आधी हे उत्पादन बाजारात टिकतंय हे सिद्ध करायचं आहे, मग मोठ्या प्रमाणावर निर्मिती करू.”

त्यांचे ग्राहक मात्र खूश आहेत. मेघालयातल्या पश्चिम जैंतिया हिल्समधल्या ख्लेहत्यर्शी या छोट्याशा गावात अल्पना बरेह आणि त्यांचे पती मार्फालांगकी चिरमांग यांनी गेल्या काही महिन्यांपासून हॉटेलसाठी ग्रीनव्हाईजची हायड्रोजन शेगडी वापरायला सुरुवात केलीय आणि ते त्यावर बेहद्द खूश आहेत. “आम्ही आधी वापरत असलेल्या एलपीजी शेगडीपेक्षा ही खूप वेगाने काम करते आणि सुरक्षित प्रणाली आधीच बसवलेली आहे, हा याचा मोठा फायदा आहे. गॅसच्या दुर्भिक्ष्यानंतर आम्ही दोन व्यावसायिक स्वरूपाच्या शेगड्या घेतल्या आणि त्या परवडणाऱ्याही ठरत आहेत,” असे अल्पना सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button