
आंबेवाडी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून श्रमदानातून बंधारा
जलसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी जपली श्रमप्रतिष्ठा; पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार
राजापूर : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. याच जाणीवेतून राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबेवाडी येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बंधारा बांधत जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले.
‘थेंबा थेंबाने जलसाठा’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी बंधारा बांधण्याच्या कामात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळीत वाढ करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या अशा उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. राजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील संबंधित कर्मचारी तसेच पर्यावरण अभ्यासक आणि नगरसेविका सौ. सावनी सचिन सावंत यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावे, श्रमाचे मूल्य कळावे आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामूहिक श्रमातून जलसंधारणाचे काम करताना विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व आणि त्याच्या संवर्धनाची गरज अनुभवता आली.
विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारण्यात आलेला हा बंधारा जलसंवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती सजगतेचे प्रतीक ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आणि सामूहिक कार्याची भावना रुजण्यास मदत होणार आहे.




