एनएमएमएस तयारीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन

युनायटेड हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळा; वर्षभराच्या नियोजनावर भर

चिपळूण : पंचायत समिती शिक्षण विभाग आणि चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेच्या तयारीसंदर्भात शिक्षकांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळा युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत तालुक्यातील विविध शाळांमध्ये एनएमएमएसचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांची एनएमएमएस परीक्षेतील कामगिरी उंचावण्यासाठी अध्यापनाचे नियोजन, विषयवार सराव, विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास आणि वर्षभराची तयारी याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात युनायटेड इंग्लिश स्कूलचे शिक्षक अजित चव्हाण यांनी बुद्धिमत्ता चाचणी (MAT) विषयावर मार्गदर्शन केले. बुद्धिमत्ता चाचणीतील विविध प्रश्नप्रकार, प्रश्न सोडविण्याच्या युक्त्या, निरीक्षणशक्ती, तार्किक विचार आणि कमी वेळेत अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या तंत्रांची त्यांनी उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेला चालना देणारे अध्यापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

दुसऱ्या सत्रात पेढे-परशुराम विद्यालयाचे शिक्षक सावर्डेकर यांनी समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. विषयातील महत्त्वाचे घटक, संकल्पना समजावून सांगण्याच्या प्रभावी पद्धती, प्रश्नांचे आकलन आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक सराव यावर त्यांनी प्रकाश टाकला.

मोहन विद्यालय, आकले हायस्कूलचे शिक्षक विजय वणवे यांनी एनएमएमएस परीक्षेचे वर्षभराचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची निवड, पूर्वचाचणी, विषयवार नियोजन, नियमित सराव, घटकनिहाय चाचण्या, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव, प्रगतीचे मूल्यमापन आणि परीक्षेपूर्वीचे अंतिम नियोजन या विविध टप्प्यांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सौ. भुवड आणि सौ. चव्हाण यांनी आपल्या शाळांमध्ये एनएमएमएसची तयारी कशा पद्धतीने करून घेतली जाते, याबाबत अनुभव कथन केले. त्यांच्या अनुभवातून सहभागी शिक्षकांना विविध उपक्रम आणि अध्यापन पद्धतींची दिशा मिळाली. मुख्याध्यापक संघातर्फे सर्व शाळांसाठी एक प्रश्नसंचही वितरित करण्यात आला.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. एनएमएमएस परीक्षेच्या निकालात चिपळूण तालुक्याची कामगिरी उंचावण्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शाळांची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या एनएमएमएस निकालात चिपळूण तालुक्याची भरीव कामगिरी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असेही वाघमारे यांनी सांगितले.

कार्यशाळेस रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव शंकर गलांडे, युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय बनसोडे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव शंकर गलांडे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button