
राजापूरच्या पाणीटंचाई निवारणासाठी सव्वा कोटींचा कृती आराखडा
टंचाईच्या पार्श्वभूमीवर १५ वनराई बंधारे; टँकर, जनरेटर, विहीर-बोअरवेल दुरुस्तीसह विविध उपाययोजना
राजापूर प्रतिनिधी : दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राजापूर शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सुमारे सव्वा कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा एकमुखी ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक झाली. शहरात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना नगराध्यक्षा खलिफे यांनी दिल्या.
संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी कोदवली धरण परिसर, कोदवली नदीपात्र तसेच शिळ जॅकवेल व अर्जुना नदीपात्रात वनराई बंधारे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गुरुवारपासून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दिली.
शहरातील पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा
विशेष बैठकीत शहरातील सद्यस्थितीतील पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोंढेतड परिसरातील पाणीपुरवठा वाहिनीला गळती लागल्याने या भागासह शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा मुद्दा नगरसेवक सौरभ पेणकर आणि साजिया काझी यांनी उपस्थित केला. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
शहरातील ज्या भागांमध्ये पाणीटंचाई अथवा पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत आहेत, त्यांची माहितीही बैठकीत घेण्यात आली. प्रशासनाच्या वतीने संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सभागृहास देण्यात आली.
यामध्ये शहरातील पाणीपुरवठ्याचे स्रोत अधिक भक्कम करणे, कोदवली धरण व शिळ जॅकवेल येथे दोन मोठे, तर अर्जुना व कोदवली नदीपात्रात १४ छोटे, असे एकूण १५ वनराई बंधारे बांधणे, पाणी वितरण व्यवस्थेतील गळती रोखणे, सार्वजनिक व खासगी विहिरींची स्वच्छता करणे, शिळ जॅकवेलकडील रखडलेले स्वतंत्र वीजवाहिनीचे काम पूर्ण करून घेणे, जनरेटर खरेदी करणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी या उपाययोजनांचा अहवाल सभागृहात सादर केला.
पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि वारंवार निर्माण होणाऱ्या तक्रारींसाठी पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी केला. गटनेते ॲड. जमीर खलिफे, ॲड. राहुल तांबे, आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, बांधकाम सभापती सुबोध पवार यांनीही चर्चेत सहभागी होत पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई
शहरातील पाणीपुरवठा वाहिन्यांवर विद्युत पंप बसवून केली जाणारी पाणीचोरी ही गंभीर समस्या असल्याचे पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी निदर्शनास आणून दिले. कारवाई केल्यानंतर पुन्हा संबंधितांचे पाणी संयोजन जोडले जात असल्याने कारवाईचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या पाणीचोरीचा शोध घ्यावा. पाणीपुरवठा वाहिनीवर विद्युत पंप लावून पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच दुष्काळी व टंचाईची परिस्थिती दूर होईपर्यंत संबंधितांचे पाणी संयोजन पुन्हा जोडू नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
नगराध्यक्षा ॲड. खलिफे यांनीही पाणीचोरी ही शहरातील गंभीर समस्या असून प्रशासनाने त्याला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे निर्देश दिले.
कामचुकारपणा खपवून घेणार नाही : मुख्याधिकारी
राजापूर शहरातील पाणीटंचाई दूर करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी स्पष्ट केले. लांजा नगरपंचायतीचे क्षेत्र राजापूरपेक्षा मोठे असूनही तेथे कमी कर्मचारीवर्गात चांगले काम होत आहे. मात्र राजापुरातील पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबाबत आपण समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. या कारवाईत कोणीही हस्तक्षेप करू नये, असा इशाराही कुंभार यांनी दिला.
भविष्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पाणीपुरवठा विभागाचा तात्पुरता पदभार बांधकाम अभियंता रणवीर देसाई यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
टंचाई आराखड्यात कोणत्या कामांसाठी किती निधी?
नगर परिषद प्रशासनाने तयार केलेल्या सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या टंचाई कृती आराखड्यात विविध उपाययोजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा : ५० लाख रुपये
विहीर व बोअरवेल दुरुस्ती : १० लाख रुपये
पंप व मोटार दुरुस्ती : ५ लाख रुपये
पाईपलाईन दुरुस्ती : ५ लाख रुपये
गळती नियंत्रण : ५ लाख रुपये
तात्पुरती पाणी वितरण व्यवस्था : ५ लाख रुपये
वनराई बंधारे बांधणे : १० लाख रुपये
जनरेटर खरेदी : २५ लाख रुपये
अशा प्रकारे सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
बैठकीला नगरसेवक दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, सिद्धांत जाधव, शबाना मुल्ला, अमिना गडकरी, नेहा तानवडे, जान्हवी वादक, प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर, सान्वी रावण, महेश शिवलकर, सुभाष बाकाळकर यांच्यासह नगर परिषद प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी चर्चेत सहभागी होत पाणीटंचाई निवारणासाठी विविध सूचना मांडल्या.




