
जागतिक पक्षी स्थलांतर दिनानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीवर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची मुलाखत
रत्नागिरी-
आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीने आयोजित या लोकप्रिय ‘इंद्रधनुष्य’ या कार्यक्रमात उद्या, शनिवार ९ मे २०२६ रोजी जागतिक पक्षी स्थलांतर दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. प्रशांत सातपुते यांची मुलाखत होणार असून, पक्षी स्थलांतर आणि निसर्ग संवर्धन या विषयावर ते श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. विवेक वानखेडे यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे.
रत्नागिरी आकाशवाणी केंद्राने नेहमीच सामाजिक आणि पर्यावरणीय विषयांना प्राधान्य दिले आहे. कोकणचा किनारा आणि येथील निसर्गसंपदा ही स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन मानली जाते. याच पार्श्वभूमीवर, पक्ष्यांचे स्थलांतर का होते, त्याचे मानवी जीवनातील महत्त्व आणि या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत, यावर श्री. सातपुते यांची मुलाखत होणार आहे.
हा कार्यक्रम शनिवारी सकाळी ठीक ९:३० वाजता विविध श्रोत्यांना हा संवाद आकाशवाणीच्या मध्यम लहरी (MW) ११४३ kHz, एफ.एम. (FM) १०१.५ मेगाहर्ट्झ, तसेच ‘NewsOnAir’ या मोबाईल ॲपवर थेट ऐकता येणार आहे. निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांनी या माहितीपूर्ण संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.




