
लोकशाहीच्या रक्षणासाठी चिपळूणमध्ये जनआक्रोश; निषेध मोर्चाला महामोर्चाचे स्वरूप
चिपळूण : लोकशाही, संविधान आणि मतदारांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासह रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चाला नागरिकांचा मोठा सहभाग लाभल्याने त्याचे महामोर्चात रूपांतर झाले. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय-सामाजिक प्रवाहांतील नागरिक तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले.
मोर्चापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जीप्सी कॉर्नर येथे सभा झाली. आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री व माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर कार्याध्यक्ष शिरीष काटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष पाथरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते विनोद कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश (बारक्या शेठ) बने यांच्यासह महाविकास आघाडीतील स्थानिक नेतेही उपस्थित होते.
आमदार भास्करराव जाधव यांनी SIR प्रक्रिया, मतदार यादीतील नावांची वजावट, हरकतींची प्रक्रिया आणि Form 6 मधील बदलांबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली. पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत बाधित होता कामा नये, यासाठी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा प्रक्रियेतील कथित पेपरफुटी, युवकांचा रोजगाराचा प्रश्न आणि खासगी संस्थांना परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी देताना पारदर्शकतेची गरज यावरही त्यांनी भाष्य केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ फेरआढावा घेऊन पात्र तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. हा प्रश्न विधानसभेत सातत्याने मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी मंत्री व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी सामाजिक न्याय, समावेशक विकास आणि आर्थिक विषमतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. शेतकरी, कामगार, लघुउद्योजक आणि सामान्य नागरिकांच्या हिताला विकासाच्या केंद्रस्थानी स्थान मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दुष्काळ, पाणीटंचाई, शेती तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. निवडणूक प्रक्रियेवरील आक्षेपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी मतदारांचा अधिकार हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाचा लोकशाही हक्क असल्याचे सांगितले. SIR प्रक्रियेत मतदार यादीतील बदल आणि संभाव्य वगळणीबाबत अधिकृत व स्पष्ट माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष काटकर यांनी मोर्चा कोणत्याही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसून लोकशाही, संविधान आणि मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृतीसाठी असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी स्वतःच्या मतदार नोंदी तपासून जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष पाथरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोकणातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरही सरकारला जाब विचारला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते विनोद कदम यांनी संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलनाची गरज व्यक्त केली. तर विक्रांत जाधव यांनी SIR प्रक्रियेत पारदर्शकता, पात्र मतदारांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे आणि उत्तर रत्नागिरीतील दुष्काळाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणे हा मोर्चाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत युवराज मोहिते यांनी लोकशाही आणि संविधानाच्या प्रश्नांवर पत्रकार, लेखक, कलाकार आणि विचारवंतांनी आपली भूमिका मांडण्याचे आवाहन केले. “चिपळूणकर उशिरा जागतात; मात्र एकदा जागे झाले की प्रश्नाच्या मुळाशी जातात,” असे सांगत त्यांनी नागरिकांच्या सहभागाचे स्वागत केले.
सभेनंतर तिरंगा हातात घेत आंदोलकांनी घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. “या मोदी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हाय हाय”, “व्होट चोर, गद्दी छोड” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध राजकीय घोषणांमधून निवडणूक प्रक्रिया, सरकार आणि जनतेच्या प्रश्नांबाबतचा रोष व्यक्त करण्यात आला.
मोर्चा चिंचनाका-भोगाळे मार्गे प्रांत कार्यालयावर पोहोचला. तेथे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे दोन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली. SIR व मतदारांच्या अधिकारांशी संबंधित प्रश्न तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा प्रशासनासमोर मांडण्यात आला. निवेदन स्वीकारल्यानंतर विविध मागण्यांवर प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
मोर्चाच्या आयोजनातील सूचना भरत लब्धे यांनी दिल्या, तर नगरसेवक फैसल कास्कर यांनी सूत्रसंचालन केले. जिजाऊ ब्रिगेड, निर्भय बनो यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊनही मोर्चा नियोजित मार्गाने शांततेत पार पडला.




