रत्नागिरीच्या ओम तेरसेची बुद्धिबळात राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड


सांगली येथील विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , सांगली यांचे तर्फे शासकीय शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन नुकतेच सांगलीतील श्रीमती कस्तुरीबाई वालचंद महाविद्यालयात करण्यात आले. १४ वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत रत्नागिरी शहरातील ओम तेरसे या खेळाडूने उल्लेखनीय यश प्राप्त केले. या स्पर्धेत एकूण ४० पैकी २९ खेळाडू हे फिडे मानांकित होते. बिगरमानांकित ओमला सर्वात शेवटचे म्हणजे चाळीसावे सिडिंग असताना पण त्याने पहिल्या फेरी पासून अखेरच्या फेरी पर्यंत सर्व फिडे रेटेड खेळाडूंना चांगली झुंज देत ६ फेऱ्यांमध्ये ४.५ गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला.

मानेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये आता इयत्ता आठवीत शिकत असलेल्या ओमचा बुद्धिबळातील प्रवास जुलै २०२४ मध्ये सुरू झाला. इंटरनेट वरील एका बुद्धिबळाच्या साईट वर त्याचे पहिले अकाउंट तयार केले व सुरुवातीला कोणाच्याही मदतीशिवाय युट्यूबवरील व्हिडिओ , ऑनलाईन खेळणे इत्यादी मार्गांनी बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली. त्याची बुद्धिबळातील आवड पाहून त्याच्या पालकांनी त्याला रत्नागिरी मधील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमित प्रवेश घेऊन दिला , जिथे तो सध्या बुद्धिबळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.

अल्पावधीतच ओम याने बुद्धिबळात केलेल्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेड येथे होणाऱ्या राज्य निवड स्पर्धेत ओम रत्नागिरी जिल्ह्याचे विभागातर्फे प्रतिनिधित्व करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button