
दापोलीच्या वराडकर-बेलोसे महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात
दापोली, ६ ऑक्टोबर : मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन क्रीडा समितीच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेला दापोली येथील एन. के. वराडकर कला व आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आज उत्साहात सुरुवात झाली. सहा, सात आणि आठ ऑक्टोबर असे तीन दिवस ही स्पर्धा होणार असून सहा व सात ऑक्टोबर रोजी मुलांचे, तर आठ ऑक्टोबर रोजी मुलींचे सामने होणार आहेत. स्पर्धेत एकूण १५ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. धनंजय लक्ष्मण यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन क्रीडा समितीचे सचिव प्रा. शशांक उपशेट्ये, मा. श्री. चंद्रकांत नाईक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत द. कऱ्हाड , क्रीडा विभागाचे डॉ. सुरेश निंबाळकर, प्रा. पूनम सावंत, सूत्रसंचालकं स्कंधा खेडेकर, प्रा. दीपक गडकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निंबाळकर सरांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत द. कऱ्हाड यांच्या हस्ते मा. श्री. धनंजय यादव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित इतर मान्यवरांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना धनंजय यादव यांनी “खेळणे महत्त्वाचे आहे; हार-जीत होतच असते” असा प्रेरणादायी संदेश खेळाडूंना दिला. खेळामध्ये सहभागी होणे, आपले सर्वोत्तम देणे आणि सकारात्मक वृत्ती ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. शशांक उपशेट्ये यांनी खेळाडूंनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले. मुंबई विद्यापीठाचे तसेच स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पाळावेत. खेळामध्ये शिस्तीला विशेष महत्त्व असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. भारत द. कऱ्हाड यांनी आपल्या मनोगतात मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक मनोज रेड्डी यांचे आभार मानले. आपल्या महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी अनुदान दिल्याबद्दल त्यांनी क्रीडा विभागाचे आभार व्यक्त केले.
उद्घाटनानंतर प्रत्यक्ष सामन्यांना सुरुवात झाली. पहिला सामना हिरवळ संस्थेचे विज्ञान महाविद्यालय, महाड आणि सावर्डे महाविद्यालय, चिपळूण या दोन संघांमध्ये झाला. सामन्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेच्या सामन्यांसाठी ओमकार महादेव कोयरेकर, साहिल सूर्यकांत मोंडकर, गौरंग प्रमोद कुरटे, मिनार प्रमोद कुरटे आणि प्रणव विकास पाळंदे पंच म्हणून काम पाहत आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. पूनम सावंत, प्रा. तेजस रेवाळे, प्रा. गणेश मांगडे आणि अनंत खोतकर यांच्यासह महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
मुलांचे सामने ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. ८ ऑक्टोबर रोजी मुलींच्या गटातील सामने होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसही महाविद्यालयाच्या मैदानावर चुरशीचे सामने पाहायला मिळणार असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.




