जरांगेंची कोंडी वाढली!आंदोलनातील महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; गंभीर आरोप करत गुन्ह्याची मागणी!

पुणे : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे सत्र सुरूच असून, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवाली सराटी येथील रहिवासी ललिता तारक यांनी जरांगेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनसह थेट मंत्रालयात जाऊन राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली आहे.

पाटोदा येथील आंदोलन अचानक मागे घेणे आणि अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा स्टेज हटवणे या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे जरांगेंच्या समर्थकांनी आपल्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, बदनामी केली आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या, असा आरोप या दोन्ही महिलांनी केला आहे. यासंदर्भात अनेकदा पोलिसांत तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची मंत्रालयात भेट घेतली.

आपण राज्याच्या ‘लाडक्या बहिणी’ असून आपल्याला त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहविभागाला चौकशी व योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. रेखा कोंडे यांनी स्पष्ट केले की, 2023 पासून मराठा समाजाच्या प्रश्नासाठी जरांगे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आझाद मैदानातील आंदोलनानंतर आणि पाटोद्यात अचानक आंदोलन गुंडाळल्यामुळे त्यांचा जरांगेंवरील विश्वास उडाला.

दरम्यान विखे पाटील यांनी मानलेल्या मागण्यांचे पत्र मागितले असता, जरांगेंच्या समर्थकांनी चारित्र्यहनन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची फसवणूक केली असून आता ते उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत, असा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.त्यामुळे आता जरांगे पाटील यांची यावर काय भुमिका असणार हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button