
संगमेश्वर तालुक्यात ऑनलाईनचा गोंधळ शेतकरी हवालदिल
संगमेश्वर तालुक्यात यावर्षीच्या पीक पाहाणी सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून तालुक्यातील शेतकरी सध्या एकाचवेळी निसर्गाची अवकृपा, तांत्रिक गोंधळ आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव अशा तिहेरी संकटाचा सामना करीत आहेत. चालू हंगामात तालुक्यात तब्बल ८ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र स्थिर आहे. दुसरीकडे नाचणीच्या लागवडीत मात्र समाधानकारक वाढ झाली असून ते क्षेत्र १०० हेक्टरवरून १२०.७६ हेक्टरवर पोहोचले आहे. परंतु, शेतातील हे हिरवेगार पीक सरकारी दरबारी नोंदविताना शेतकर्यांच्या नाकीनऊ येत आहे.
शासनाच्या ऑनलाइन पीक पाहाणी ऍपमध्ये मोठ्याप्रमाणावर तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हे नंबर प्रविष्ट केल्यानंतर भलताच सातबारा समोर येणे, पीक नोंदणीमध्ये अचानक अडथळे येणे आणि प्रक्रिया पूर्ण न होणे अशा गंभीर तक्रारी सर्वत्र वाढल्या आहेत. यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाची मदत, विविध योजना आणि नुकसानभरपाई मिळण्यासाठी अचूक पीक पाहाणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, ऑनलाईन प्रणालीतील या गोंधळामुळे प्रत्यक्ष शेतातील पीक आणि कागदोपत्री नोंद यात तफावत राहून शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी बंड्या लिंगायत यांनी या तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्याची जोरदार मागणी केली आहे.



