
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णै-पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर हिवाळी पाहुण्यांचे आगमन
पावसाळा ओसरू लागताच दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णै-पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर हिवाळी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. दरवर्षी हिवाळ्यात या किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या स्थलांतरित समुद्री पक्ष्यांपैकी ‘सीगल’ पक्ष्यांचे यंदाच्या हंगामातील पहिले दर्शन १ ऑक्टोबर रोजी झाले.समुद्री जैवविविधता अभ्यासक फहद जमादार यांनी नियमित किनारा गस्तीवेळी या पक्ष्यांची नोंद झाली.
हर्णै-पाळंदे समुद्रकिनारा हा समृद्ध समुद्री जीवसृष्टीसोबतच स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अधिवास मानला जातो. हिवाळ्याची चाहूल लागताच विविध प्रजातींच्या पक्ष्यांची वर्दळ येथे वाढते. यंदा सीगलच्या पहिल्या आगमनाने स्थलांतरित पक्ष्यांच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.




