
राणेंच्या विजयाला आव्हान देणारी राऊतांची याचिका फेटाळली
भ्रष्ट आचरणाच्या आरोपांचे आवश्यक तपशील नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
*मुंबई * रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील खासदार नारायण राणे यांच्या २०२४ मधील विजयाला आव्हान देणारी विनायक राऊत यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने फेटाळली. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी राणे यांचा अर्ज मंजूर केला.
राऊत यांनी प्रचाराची मुदत संपल्यानंतरही प्रचार आणि मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले होते. मात्र, कथित भ्रष्ट आचरण कुठे, कधी आणि कोणाच्या सहभागाने झाले, याचा आवश्यक तपशील याचिकेत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. वृत्तपत्रांच्या बातम्या व इलेक्ट्रॉनिक पुरावे मूलभूत तथ्यांची कमतरता भरून काढू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ८३(१) मधील आवश्यकतेचे पालन न झाल्याने राऊत यांची याचिका सुरुवातीलाच फेटाळण्यात आली.




