शिकारीदरम्यान बंदुकीतून गोळी सुटली; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी


वणौशी-खोंडारण येथील घटना; गावठी बंदुकीच्या छर्र्यांमुळे दुर्दैवी प्रकार


दापोली दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. ३० सप्टेंबरच्या रात्री गावठी बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने उडालेल्या छर्र्यांमुळे एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. सचिन शांताराम शिगवण (वय ४४, रा. खोंडारण, खालचीवाडी) असे मृताचे नाव असून, सुनील पांध्ये (वय ४८) हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांध्ये हे दोघे ३० सप्टेंबरच्या रात्री वणौशी-खोंडारण परिसरातील जंगलात शिकारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडील गावठी बंदुकीतून अचानक गोळी सुटली. गोळीतील चार ते पाच छर्रे सचिन यांच्या पोटात आणि पोटाच्या खालच्या भागात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील पांध्ये यांच्या मांडीला दोन ते तीन छर्रे लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमी सुनील पांध्ये यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनास्थळावरील आवश्यक पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बंदुकीतून गोळी नेमकी कशामुळे सुटली, शस्त्र कोणाच्या मालकीचे होते आणि त्याचा परवाना होता का, यासह घटनेच्या विविध पैलूंचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस पुढील तपास व कायदेशीर कारवाई करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button