वाशिष्ठी नदीवरील पूलासाठी नोव्हेंबर अखेरची मुदत; अन्यथा 6 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी–नांदिवसे मार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळून सुमारे वर्ष उलटत आले तरी पुलाचे काम अपेक्षित वेगाने पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सुमारे 14 ते 15 गावांतील नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच MIDC परिसरातील वाहतूक मोठ्या अडचणीत सापडली आहे. पुलाचे काम नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा 6 डिसेंबर 2026 पासून पर्यायी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

या पुलाची आवश्यकता असल्याबाबत सन 2007 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात येत असल्याचे अडरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. सन 2017 व 2022 मधील महापुराच्या काळात पुलावर सुमारे 15 फूट पाणी गेले होते. त्यावेळी पुलाचे रेलिंग व पाईपलाईनचे नुकसान झाले होते. त्यामुळे परिसरातील अनेक मार्ग तसेच MIDC परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.

सन 2023 मध्ये पुलासाठी सुमारे ₹1.48 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानंतर ते सुमारे ₹1.98 कोटींपर्यंत सुधारित करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. निधी व प्रशासकीय प्रक्रियेमुळे कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, 23 ऑगस्ट 2025 रोजी नागरिक पुलावर उपस्थित असताना MIDC व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पुलाची मालकी व हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू असतानाच पूल कोसळला. या घटनेत नागरिक थोडक्यात बचावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पूल कोसळल्यानंतर परिसरातील सुमारे 14–15 गावांचा संपर्क, MIDC मधील दळणवळण तसेच कामगार व विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली.

पूल कोसळल्यानंतर पर्यायी मार्गाचा वापर सुरू करण्यात आला. मात्र हा मार्ग चिंचोळा असून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने गेल्या वर्षभरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचे तातडीने मजबुतीकरण, आवश्यक रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पुलाच्या बांधकामासाठी संबंधित विभागांमध्ये दीर्घकाळ प्रशासकीय प्रक्रिया सुरू राहिल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. पुलाच्या कामाची सद्यस्थिती, अंदाजपत्रकातील वाढ, निविदा प्रक्रिया, कामाचा वेग आणि काम पूर्ण होण्याची निश्चित तारीख याबाबत प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट माहिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“एक वर्षापासून नागरिक संयमाने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांचे शिक्षण, कामगारांची रोजची ये-जा, गावांचा संपर्क आणि सार्वजनिक सुरक्षितता यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे,” अशी मागणी मुराद अडरेकर यांनी केली आहे.

पुलाचे काम नोव्हेंबर 2026 अखेर पूर्ण झाले नाही आणि पर्यायी मार्गाची आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरण झाले नाही, तर 6 डिसेंबर 2026 पासून संबंधित पर्यायी मार्गांवर लोकशाही व सनदशीर मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी रत्नागिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, MIDC प्रशासन तसेच उद्योग विभागाकडे निवेदन व पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते आणि पुलाच्या कामाला प्रत्यक्षात किती गती मिळते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button