डॉक्टरांना ३१ ऑक्टोबरपर्यंत क्यूआर कोड प्लेट लावणे बंधनकारक


वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासोबतच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी ‘नो युअर डॉक्टर’ (KYD) क्यूआर कोड प्लेट अनिवार्य केली आहे.डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक, रुग्णालय किंवा प्रॅक्टिस सेंटरमध्ये ही प्लेट ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लावणे आवश्यक आहे.

एमएमसीच्या अधिकृत प्रणालीतून प्राप्त झालेली मूळ व डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्लेटच ग्राह्य धरली जाणार आहे. क्यूआर कोडचा स्क्रीनशॉट किंवा साधा प्रिंटआउट ग्राह्य धरला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी प्लेटवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टरांचे नाव, शैक्षणिक पात्रता, एमएमसी नोंदणी क्रमांक, नोंदणीचा कालावधी आणि प्रॅक्टिसशी संबंधित अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांची वैधता तपासणे रुग्णांना सहज शक्य होणार आहे.निर्धारित मुदतीत प्लेट न लावणाऱ्या डॉक्टरांवर एमएमसीकडून दंडात्मक तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातही बोगस डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी होत असताना या निर्णयामुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत प्लेट लावणे बंधनकारक सर्व नोंदणीकृत डॉक्टरांनी एमएमसीच्या पोर्टलवरून आपली ‘नो युअर डॉक्टर’ क्यूआर कोड प्लेट जनरेट करून ती आपल्या क्लिनिक किंवा रुग्णालयात दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.
बोगस आणि अपात्र डॉक्टरांना लागणार चाप

राज्यात अनेक ठिकाणी बोगस किंवा अपात्र व्यक्ती वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ‘केवायडी’ प्लेट अनिवार्य झाल्यामुळे केवळ एमएमसीकडे नोंदणीकृत असलेले वैध डॉक्टरच ही प्लेट लावू शकतील. बोगस डॉक्टरांच्या व्यवसायाला चाप बसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button