
गुन्हे रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचा अनोखा उपक्रम
वाढते सायबर गुन्हे, अपघात, पोस्कोच्या केसेस, अमली पदार्थ गुन्हे ही चिंतेची बाब आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात आगामी काळात होणार्या ६५३ ग्रामसभामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जाऊन घडणार्या या गुन्ह्यांबाबत प्रबोधन करणार आहेत. यातून नागरिकांमध्ये सजकता येऊन गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा पोलीस दलाने राबविलेला हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला उपक्रम आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पोलीस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी, गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते. श्री. बगाटे म्हणाले, नागरिकांमध्ये पोलीस दलातर्फे वारंवार जनजागृती करूनही हे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. याला पर्याय म्हणून आम्ही आता ग्राम सभांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे लोकांना बोलवण्याची गरज भासत नाही. मोठ्या प्रमाणात लोक गोळा होतात. तिथे वाढते सायबर गुन्हे, अपघात, पोस्कोच्या केसेस याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडुन जिल्ह्यातील ६५३ ग्रामसभांचे वेळापत्रक घेतले आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पोलीस अधिकारी, क्रर्मचारी या ग्रामसभांना जाऊन ग्रामस्थांमध्ये याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.




