
रत्नागिरीच्या शिक्षणाला नवी उभारी! जिल्हा परिषदेत ४३६ नवनियुक्त शिक्षकांना पारदर्शक समुपदेशनाने पदस्थापनामुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने; आजारपण, व्याधीग्रस्त उमेदवारांना केले मार्गदर्शन
रत्नागिरी
: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आता नव्या ऊर्जेने गजबजणार आहेत. ‘पवित्र पोर्टल’द्वारे निवड झालेल्या प्राथमिक व पदवीधर अशा तब्बल ४३६ नवनियुक्त शिक्षकांचा समुपदेशन व पदस्थापना आदेश वाटप सोहळा जिल्हा परिषदेत मोठ्या उत्साहात, नियोजनबद्ध आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात काल पार पडला. प्रशासनाची तत्परता आणि अचूक नियोजनामुळे समुपदेशन पूर्ण होताच एकाच दिवशी हातात थेट नियुक्ती आदेश मिळाल्याने नवनियुक्त शिक्षकांमध्ये आनंदाचे भरते आले होते.
*या समुपदेशन प्रक्रियेत केवळ नियमांवर बोट न ठेवता जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील चेहरा प्रकर्षाने दिसून आला. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी स्वतः पुढाकार घेत आजारपण, शारीरिक व्याधी असणाऱ्या उमेदवारांची आस्थेने विचारपूस केली. अशा उमेदवारांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी स्वतः जातीने मार्गदर्शन करत त्यांना प्रवासासाठी व आरोग्यासाठी सोयीची शाळा निवडण्यास मोलाची मदत केली. प्रशासनाच्या या माणुसकीच्या भूमिकेने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी त्यांच्या संवेदनशीलतेचे भरभरून कौतुक केले.
*पारदर्शकता आणि संवेदनशीलतेचा संगम*
या समुपदेशनात २०८ उपशिक्षक आणि २२८ पदवीधर शिक्षकांना मेरिटनुसार थेट शाळा निवडीचा हक्क देण्यात आला. दिव्यांग बांधव, आजारी उमेदवार आणि महिला शिक्षकांच्या सोयीचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला. शाळा निवडताना कोणावरही घाईगडबड न करता प्रत्येकाला पुरेसा वेळ आणि योग्य मार्गदर्शन दिले गेले. त्यामुळे सर्व उमेदवार अत्यंत समाधानाने आपल्या शाळा निवडून आनंदाने रुजू होण्यासाठी सज्ज झाले.
जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला मिळणार गती
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, कृषी सभापती महेश नाटेकर तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे व रेवती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. “या नव्या आणि उत्साही शिक्षकांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची उणीव भरून निघेल आणि कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी झळाळी मिळेल,” असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रशासकीय पथकाचे अचूक नियोजन
हा संपूर्ण उपक्रम वेळेत, सुरळीत आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
हातात मानाचा नियुक्ती आदेश आणि मनात ज्ञानदानाची नवी उमेद घेऊन हे ४३६ शिलेदार आता रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातील शाळांवर रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत.




