हजारो मैल दूर ओमानमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया’; कोकणच्या तरुणांची २० वर्षांची परंपरा

लांजा : रोजगाराच्या निमित्ताने देशाच्या सीमा ओलांडून परदेशात स्थायिक झाले, तरी कोकणच्या मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आजही घट्ट असल्याचे चित्र ओमानमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल २० वर्षांपासून ओमानमध्ये वास्तव्यास असलेल्या कोकणातील मराठी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात असून, हजारो मैल दूर असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष घुमत आहे.

ओमानमधील अल तसनीम सिमेंट प्रोडक्ट्स बॅचिंग प्लांट येथे ‘श्री गणेश मित्रमंडळा’च्या माध्यमातून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त ओमानमध्ये गेलेल्या कोकणातील तरुणांनी एकत्र येत सुरू केलेली ही गणेशोत्सवाची परंपरा दोन दशकांनंतरही अखंडपणे सुरू आहे.

या गणेशोत्सवातील आकर्षक देखावा हे विशेष आकर्षण ठरत आहे. ओमानमध्ये वास्तव्यास असलेले खेड-सडेवाडी येथील चंद्रकांत चिनकटे यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून दरवर्षी देखावा साकारला जातो. परदेशातील उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करून गणेशोत्सवाचा पारंपरिक बाज जपण्याचा प्रयत्न यंदाही करण्यात आला आहे.

या उत्सवाच्या आयोजनात कोकणातील विविध गावांशी नाते असलेले अनेक मराठी बांधव सहभागी झाले आहेत. यामध्ये नितीन गोरीवले (भिले, चिपळूण), संतोष घरवे (होडखाड, खेड), महादेव शिगवण (होडखाड, खेड), रोहित गजमल (चिपळूण), प्रकाश शिगवण (शिव, खेड), नयन मालप (अणसपुरे, खेड), मंगेश पानवलकर (अणसपुरे, खेड), चक्रवती (मुंबई), संदेश कांदेकर (तळघर, खेड) तसेच लांजा शहरातील नामदेव नगर येथील चंद्रकांत कांबळे आदींचा समावेश आहे.

गणेशोत्सवाच्या काळात आरती, पूजा आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. परदेशात राहूनही गणरायाच्या माध्यमातून एकत्र येत कोकणची संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जात आहे.

मायभूमीपासून हजारो मैल दूर असतानाही गणरायाच्या उत्सवातून कोकणची संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या या मराठी बांधवांच्या उपक्रमामुळे ओमानमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह आणि मायभूमीच्या आठवणींचा सुगंध अनुभवायला मिळत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button