
लोटेत कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल
खेड : पटवर्धन-लोटे परिसरात कल्याण मटका जुगाराचे आकडे घेऊन जुगार खेळविणाऱ्या एकावर खेड पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पटवर्धन, लोटे येथील रुक्मिणी निवास इमारतीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सचिन सुरेश चव्हाण (वय ३५) याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या ‘कल्याण मटका’ या जुगाराच्या आकड्यांवर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारून जुगार खेळत व खेळवत असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १,८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे नमूद आहे. यामध्ये १० रुपयांचे मटका पावती पुस्तक, ५ रुपयांचा निळ्या रंगाचा बॉलपेन तसेच रोख रक्कम ९७० रुपये यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पोकॉ सुहास हिंदुराव पाटील (ब. नं. ७४०), खेड पोलीस ठाणे अंतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्र यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.




