वाटद एमआयडीसीतील ’डिफेन्स क्लस्टर’ हटवा!


रत्नागिरी तालुक्यातील वाटद एमआयडीसी परिसरात प्रस्तावित असलेला डिफेन्स क्लस्टर (संरक्षण प्रकल्प) रद्द करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. या प्रकल्पाविरोधात वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती आक्रमक झाली असून, समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर आणि पदाधिकार्‍यांनी थेट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे. स्थानिक परिस्थिती, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक व्यवसायांचा विचार न करता लादला जाणारा हा प्रकल्प संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी घातक ठरेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
शासनाने १४ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकल्पाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. मात्र, हा प्रकल्प स्थानिक १० ते १२ गावांतील शेती, फळबाग आणि निसर्गावर गदा आणणारा आहे. कोकणची ओळख असणारा जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि काजूच्या बागा या भूसंपादनात नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवाय, किनारपट्टीवर सुरक्षेच्या कारणास्तव कडक निर्बंध लादले गेल्याने स्थानिक कोळी बांधवांचा मासेमारी व्यवसाय धोक्यात येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, होमस्टे व हॉटेल्सच्या माध्यमातून विस्तारणार्‍या पर्यटन व्यवसायालाही या संवेदनशील प्रकल्पामुळे मोठा फटका बसणार आहे.
संरक्षण प्रकल्पामुळे संपूर्ण परिसर अतिदक्षता क्षेत्र म्हणून घोषित होईल, ज्यामुळे स्थानिकांना स्वतःच्याच घरात आणि शेतात वावरताना कडक परवानग्या व सुरक्षेचा जाच सहन करावा लागेल, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याआधी परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी आणि ग्रामसभांनी या प्रकल्पाविरोधात एकमुखाने ठराव मंजूर केले आहेत. तरीही या ठरावांकडे दुर्लक्ष करणे हा संविधानाच्या ७३ व्या घटनादुरुस्तीचा अपमान असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button