
उद्यम नगर येथील राजापूरकर कॉलनीत वीज मंडळाचा ‘धोकादायक’ स्टे; कधीही डोक्यावर कोसळण्याची भीती!
वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष; खासगी केबलच्या आधारावर लोंबकळतोय स्टे
उद्यम नगर येथील राजापूरकर कॉलनी परिसरातील रस्त्यावर वीज मंडळाच्या पोलला आधार देणारा स्टे तुटून धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा स्टे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर कोसळण्याची शक्यता असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, हा स्टे सध्या एका खासगी केबलवर अडकून राहिला आहे. संबंधित केबलही कधीही तुटण्याची शक्यता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. स्टे किंवा केबल तुटल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
या धोकादायक परिस्थितीबाबत शिरगाव येथील महावितरण कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतरच महावितरण जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महावितरणने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन धोकादायक अवस्थेतील स्टे सुरक्षित करावा आणि संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.



