
पाच दिवसांत दापोलीचा पाणीप्रश्न सुटणार रामदास कदम यांची ग्वाही; महावितरणच्या अधिकाऱ्यांना अडचणी दूर करण्याच्या सूचना
दापोली, ता. २१ : शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायतीला सदिच्छा भेट देणारे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या वीजपुरवठ्यातील अडचणी पाच दिवसांत दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, अशी ग्वाही कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अडचणींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश कदम यांनी दिले. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवसांत समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
नगरपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी दररोज सुमारे ४८ हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. नागरिकांना नियमित पाणी मिळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, नगरपंचायतीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांनी कदम यांची भेट घेऊन कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. याबाबत नगरविकास खात्याशी चर्चा सुरू असून, लवकरच त्यांना योग्य न्याय मिळेल, असे कदम यांनी सांगितले.
दापोली शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीला लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.




