
बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहणार?, SBI कडून ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना!
देशभरातील बँक कर्मचारी २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना महत्त्वाचे बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.
विशेष म्हणजे, २६ आणि २७ सप्टेंबरला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ग्राहकांना सलग पाच दिवस शाखांमधील सेवांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
२८ ते ३० सप्टेंबर बँक कर्मचारी संपावर
एसबीआयने ग्राहकांना दिलेल्या सूचनेनुसार, ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. एसबीआयने म्हटले आहे की, संपामुळे शाखांमधील बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन व्यवहार करायचे आहेत किंवा एखादा व्यवहार वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यांनी तो संप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावा.
बँक कर्मचारी कोणत्या मागण्यांसाठी संपावर?
बँक कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. त्यातील प्रमुख मागण्या अशा आहेत :-*श
- पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा.
- पेन्शनच्या लाभांमध्ये सुधारणा आणि अद्ययावत बदल करावेत.
- सर्व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याचे एकसमान सूत्र लागू करावे.
- राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय द्यावा.
- पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’कडून देशातील सुमारे ९० टक्के बँकिंग कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मागण्यांसाठी बँक संघटनांनी यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप केला होता.
शाखा बंद असतील तर ग्राहकांनी काय करावे?
एसबीआयने ग्राहकांना संपाच्या काळात डिजिटल आणि इतर पर्यायी बँकिंग सुविधांचा वापर करण्याची सूचना दिली आहे. रोख पैशांसाठी एटीएम आणि रोख स्वीकारणाऱ्या व देणाऱ्या मशिनचा (एडीडब्ल्यूएम्स) पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, इतर व्यावसायिक व इतर व्यवहारांसाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, वायओएनओ प्लॅटफॉर्म, यूपीआय, ग्राहक सेवा केंद्र आणि विविध डिजिटल सेवांचा वापर करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. मात्र, शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावा लागणारा किंवा वेळेची मर्यादा असलेला व्यवहार असल्यास तो २८ सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करणे योग्य ठरेल.
सरकारकडूनही तयारी सुरू
दरम्यान, तीन दिवसांच्या संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सोमवारी होणार असून, संपाच्या काळात बँकिंग व्यवहार आणि आवश्यक ग्राहक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि आपत्कालीन उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना अत्यावश्यक बँकिंग सुविधा उपलब्ध राहाव्यात आणि संपामुळे होणारा परिणाम कमीत कमी व्हावा, यासाठी या बैठकीत उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.



