
वैश्य वाणी जिल्हा संघटनेच्या प्रयत्नांना यश” जातीचा दाखला, जात पडताळणी सुलभ झाली : डॉ. विकास शेट्ये
चिपळूण : वैश्य वाणी समाजाला जातीचा दाखला मिळविणे जात पडताळणी करून घेणे त्रासदायक ठरत होते. सन २०१४ या वर्षी वैश्य वाणी समाजाला कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये समावेश केला (१९० नंबर) यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाने प्रामुख्याने महत्वाची भुमिका बजावली होती.
सन २०१४ ते २०१९ पर्यंत वैश्य वाणी समाज बांधवांना जातीचा दाखला मिळविणे आणि जात पडताळणी करून घेणे सहज शक्य होत होते. मात्र १९६७ पूर्वीचा पुरावा दाखला सादर करतांना काही ठिकाणी वैश्य, हिंदू वाणी, हिंदू वैश्य असा वेगवेगळा जातीचा उल्लेख असल्यामुळे अधिकारी यांना शंका निर्माण झाली आणि जातीचा दाखला देणे व जात पडताळणी करणे थांबविण्यात आली. अनेक समाज बांधवांनी याबाबत आपल्या जिल्हा संघटनेकडे विचारणा केली. हिंदू वैश्य, हिंदू वाणी, वैश्य हे सगळे वैश्य वाणीच आहेत. हे शासनाने मान्य केले आहे. तरीही अडचण येत आहे असे निदर्शनास आणले.
यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न सुरू करणेत आला आपले संगमेश्वर येथील समाज बांधव श्री. स्वप्नील शेटये यांनी याबाबत पत्रव्यवहार केला आणि तत्कालीन सामाजिक कल्याण न्याय मंत्री श्री. संजय सावकारे यांनी मंत्रालयात सभा बोलावली त्यावेळी डॉ. विकास शेट्ये जिल्हा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. त्यानंतर वेळोवेळी त्या त्या समाज कल्याण बहुजन मंत्री अगदी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार या सर्वांनी यासाठी प्रयत्न करून सभा घेतल्या निर्णय होत होते. परंतु अधिकृत परिपत्रक (जी.आर.) निघत नव्हता. मा. आमदार प्रमोदजी जठार यांनी विधी मंडळात प्रश्न उपस्थित केला.
याबाबत मा. नामदार उदयजी सामंत, मा. आमदार किरणभैया सामंत आणि मा. आमदार प्रमोदजी जठार यांचेकडे
निवेदने आणि मागणी देण्यात आली. रत्नागिरी येथील पत्रकार श्री. हेमंत वणजू, नगरसेवक श्री. सौरभ मळुष्टे यांनी तसेच
लांजा येथील वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री. प्रसन्ना शेट्ये, श्री. हेमंत शेट्ये यांचे मार्फत प्रयत्न केला गेला आणि २५ ऑगस्ट
२०२६ रोजी मा. मंत्री अतुळजी सावे, बहुजन कल्याण विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी सर्वांना बरोबर घेवून चर्चा केली.
मागासवर्ग आयोग, महसुल विभाग आणि वैश्य वाणी समाजाची मुंबई संघटना प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या
प्रतिनिधींना बोलावून सभा घेण्यात आली. मा. उदयजी सामंत यांनी मंत्री महोदय यांना वस्तूस्थिती लक्षात आणून दिली.
संघटनेच्या वतीने मागासवर्ग आयोगाच्या प्रतिनिधी यांना वस्तूस्थिती लक्षात आणून दिली गेली. मा. मंत्री उदयजी सामंत,
मा. आमदार श्री. किरणभैया सामंत, मा. आमदार श्री. प्रमोद जठार, जिल्हा संघटना, मुंबई संघटना यांनी आग्रह धरला
म्हणून अखेर जून २००८ शासनाचे परिपत्रक नव्याने करणेबाबतचा निर्णय मंत्री सावे यांनी जाहिर केला.
मागासवर्ग आयोग तसेच महसुल विभाग यांना याबाबतचे आदेश दिले आणि अखेर दिनांक ०९-०९-२०२६ रोजी याबाबतचे
अधिकृत पत्रक बहुजन कल्याण विभागाने प्रसिध्द केले आणि हिंदू वाणी, हिंदू वैश्य, वैश्य या सगळ्यांनाच ‘वैश्य वाणी’
समाजाचा जातीचा दाखला देणेत यावा आणि जात पडताळणी करून द्यावी असे आदेश आले आहेत.
महायुतीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्हा वैश्य संघटनेच्या प्रयत्नांना आलेले यश आहे. संघटनेला सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचे तसेच सर्वांचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांनी आभार मानले.



