
अमली पदार्थांविरोधात ‘मिशन फिनिक्स’ची धडक; रत्नागिरीत आठवडाभरात १६ गुन्हे, २२ आरोपी अटकेत, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त!
रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर साठवणूक, बाळगणे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
८ ते १४ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अमली पदार्थ सेवनाचे १०, तर बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ बाळगल्याचे सहा असे एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांत २२ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन लाख दोन हजार २०० रुपयांचा अमली पदार्थसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अमली पदार्थांची विक्री करणारे, बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवणारे तसेच त्यांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. या कारवाईत ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, तर एक लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २.५११ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून केवळ गुन्हे दाखल करण्यापुरती कारवाई मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. विशेषतः तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवनासंदर्भात माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ‘रत्नसेतू चॅटबॉट’च्या ९३७१४१५६१२ या क्रमांकावरही माहिती देता येणार आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



