मेट्रोच्या कामाचा विक्रोळीत आणखी एक बळी; लोखंडी रस्ता रोधक अंगावर पडून एकाचा मृत्यू!

मुंबई : विक्रोळीमधील एल. बी. एस. मार्गावर शुक्रवारी दुपारी मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी रस्ता रोधक (बेरीकेड) अंगावर पडून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये मेट्रोच्या कामामुळे मुंबईत अनेकांना प्राण गमवावे लागले. काही दिवसांपूर्वीच वडाळ्यातील भक्तीपार्क परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना मचाण कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास दुचाकीस्वाराच्या अंगावर लोखंडी रस्ता रोधक पडून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. वसी हैदर (५४) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून ते घाटकोपरमधील गौसिया चाळीत वास्तव्यास होते.

प्लबिंगचे काम करणारे वसी हैदर शुक्रवारी दुपारी मुलुंड परिसरात कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. याच वेळी विक्रोळीमधील एल. बी. एस. मार्गावरील रोझरी इमारतीसमोर अचानक त्यांच्या अंगावर रस्त्यालगत उभारण्यात आलेला एक लोखंडी रस्ता रोधक पडला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हैदर यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी मेट्रोचे काम करणारी संबंधित कंत्राटदार कंपनी, सुपरवायझर आणि व्यवस्थापक आदींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

वर्षभरातील घटना

मुलुंड येथील एल. बी. एस. मार्गावर १४ फेब्रुवारी रोजी मेट्रोचा पॅरापेट स्लॅब थेट खालून जाणाऱ्या रिक्षेवर आणि मोटारीवर कोसळला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. तर १२ सप्टेंबर रोजी वडाळा येथील भक्ती पार्क मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान लोखंडी मचाण कोसळून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button