
गणपती विसर्जनावेळी बाप-लेक बावनदीत बुडाले; मुलाचा दुर्दैवी मृत्यू
माभळे येथील हृदयद्रावक घटना; वडिलांना वाचवण्यात यश,
संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे गणपती विसर्जनावेळी बावनदीच्या पात्रात बाप-लेक बुडाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत प्रज्वल पुरुषोत्तम घडशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे वडील पुरुषोत्तम गुणाजी घडशी यांना सुखरूप वाचवण्यात यश आले. या घटनेने माभळे गावावर शोककळा पसरली असून घडशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडशी कुटुंबीय आणि ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोरील बावनदीच्या काठावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन करत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल हे दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले.
बाप-लेक बुडत असल्याचे लक्षात येताच गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. प्रज्वलने आजोबांचा हात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा हात सुटला.
दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता नदीपात्रात उडी घेतली आणि पुरुषोत्तम घडशी यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर गोपाळ समाजातील युवकांनी नदीपात्रात सुमारे २० मिनिटे शोधमोहीम राबवून प्रज्वलला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारापूर्वीच प्रज्वलची प्राणज्योत मालवली.
या घटनेने माभळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घडशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणपती विसर्जनाच्या आनंदात असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.




