
गोव्याला जाणाऱ्या कारचालकावर चाकूहल्ला; नाशिकच्या तिघांना अटक
सिगारेट ओढू न दिल्याने आणि कार मध्येच न थांबवल्याच्या रागातून हल्ला; सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
राजापूरहून गोव्याला भाड्याच्या कारने जात असताना हुंबरठ येथे कारचालकावर चाकूने हल्ला करून पसार झालेल्या तिघांना कणकवली पोलिसांनी नाशिक येथून जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिघांचा माग काढला. या प्रकरणातील संशयितांनी मद्यप्राशन केले होते. कारमध्ये सिगारेट ओढू न दिल्याने तसेच मध्येच कार थांबवली नाही, या रागातून हल्ला केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे.
गौरव शिवाजी कासव (२४), गिरीश देवाजी जामदार (२४) आणि विकास ज्ञानेश्वर पठाडे (२५), तिघेही रा. अहिरखेडे, ता. चांदवड, जि. नाशिक, अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने तिघांनाही २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही संशयित गोव्यात फिरण्यासाठी रेल्वेने निघाले होते. मात्र, विनातिकीट प्रवास करत असल्याने टीसीने त्यांना राजापूर रेल्वे स्थानकात उतरवले. त्यानंतर ऑटोरिक्षाने ते राजापूर बसस्थानक परिसरात आले.
१३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता त्यांची भेट राजापूर बसस्थानकाजवळ स्विफ्ट कारचालक रेहान इकबाल सय्यद (३२, रा. वाघुवाडी, राजापूर) याच्याशी झाली. तिघांनी राजापूर ते गोवा प्रवासासाठी ४ हजार रुपयांत भाडे ठरवले आणि ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, महामार्गावर हुंबरठ येथे रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संशयितांनी लघुशंकेसाठी कार थांबवण्यास सांगितले. कार थांबल्यानंतर त्यांनी रेहानकडे कारची चावी मागितली. मात्र, रेहानने चावी देण्यास नकार दिला. त्याआधी प्रवासादरम्यान रेहानने त्यांना कारमध्ये सिगारेट ओढण्यासही मनाई केली होती.
याच कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. त्यातील एकाने रेहानचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने त्याच्यावर चाकूने वार केले. रेहानने प्रतिकार करत कारमधून बाहेर पडून आरडाओरड केल्याने तिघेही हल्लेखोर तेथून पसार झाले. या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत असलेल्या रेहानची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी कणकवली पोलिसांना दिल्यानंतर त्याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर कणकवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासातून तिघे नाशिक येथे असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस पथकाने तेथे जाऊन त्यांना जेरबंद केले.
पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू होता. पोलिस उपनिरीक्षक श्री. पन्हाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पवार यांनी संशयितांचा माग काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली



