कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आले अन् पहाटे गाडी पेटवलेली दिसली


रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरातील लॉजच्या पार्किंगमध्ये थरार; काचा फोडून वाहनाला आग, दीड लाखांचे नुकसान


रत्नागिरी : कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सांगलीहून रत्नागिरीत आलेल्या व्यक्तींच्या वाहनाला पहाटेच्या सुमारास आग लावल्याची धक्कादायक घटना शहरातील आठवडा बाजार परिसरात घडली. लॉजच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कुझर वाहनाच्या काचा फोडल्यानंतर त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या आगीत वाहनाचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.या प्रकरणी आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अशोक नागाप्पा गोठेकर (२७, रा. कडेगाव, सांगली) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादींचे मित्र अशोक बागडे यांनी त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी रत्नागिरीला जायचे असल्याचे सांगितले होते. त्यासाठी मोठे वाहन घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार गोठेकर यांनी राहुल काटकर यांच्या मालकीचे कुझर वाहन (एमएच-१०-बीएन-७१५२) भाड्याने घेतले आणि १६ सप्टेंबर रोजी रत्नागिरीकडे रवाना झाले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास रत्नागिरीत पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित कुटुंबीयांशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पुढील निर्णयासाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याचेही ठरले.

पहाटे लॉजच्या पार्किंगमध्ये गोंधळ

दरम्यान, सांगलीहून आलेल्या व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था आठवडा बाजार परिसरातील एका लॉजमध्ये करण्यात आली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास लॉजमधील कर्मचाऱ्याने फिर्यादींच्या खोलीत जाऊन “पार्किंगमधील तुमच्या गाडीला आग लागली आहे”, अशी माहिती दिली.

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्किंगमध्ये धाव घेतली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून वाहनाची आग विझवण्याचे काम सुरू होते.

सीसीटीव्हीत संशयिताची हालचाल कैद?

फिर्यादीने लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित आकाश खेत्री वाहनाच्या काचा फोडताना आणि त्यानंतर वाहनाला आग लावताना दिसून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य बाबींच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button