कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला


रत्नागिरी, दि. १६ ):- चालू वर्षी खरीप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात भात व नाचणीची सुमारे ५३ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि अल-निनोचे संकट असल्यामुळे पिकांना पावसाचा ताण बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी तातडीने हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यानुसार योग्य नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
हवामानाची सद्यस्थिती आणि पिकांची स्थिती
जिल्ह्यात जून २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण २६३४.४० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. सद्यस्थितीत बहुतांश भागात वेळेत लागवड केलेल्या हळव्या जातींच्या (उदा. रत्नागिरी १, रत्नागिरी २४ व इतर वाण) लोंबी भरल्या असून त्या १५ ऑक्टोबरपर्यंत काढणीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जातींवर पावसाच्या ताणाचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, उशिरा लागवड केलेल्या हळव्या जातींना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे महत्त्वाचे सल्ले:
पाण्याचे व्यवस्थापन: ज्या ठिकाणी पाण्याचा ताण जाणवत आहे, तिथे शेतकऱ्यांनी भात खाचरामध्ये ५ ते १० सेमी पाण्याची पातळी राखावी. यासाठी तातडीने बांधदुरुस्त करून उपलब्ध जलस्रोतांतून पाणी खाचरांमध्ये वळवावे.
नत्र खताचा वापर: हळव्या भात जाती फुलोरा अवस्थेत असताना युरियाचा तिसरा हप्ता (४३५ ग्रॅम प्रति गुंठा) जमिनीत पुरेसा ओलावा असताना व शक्यतो दुपारनंतर पानांवर ओलावा नसताना व पावसाची उघडीप असताना द्यावा. निमगरव्या व गरव्या जातींसाठी पाऊस लांबल्यास हा हप्ता तात्पुरता टाळावा.
करपा व जिवाणूजन्य करपा: ढगाळ हवामानामुळे प्रादुर्भाव झाल्यास ट्रायसायक्लाझोल किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड सोबत स्ट्रप्टोसायक्लाइनची दर १५ दिवसांनी फवारणी करावी.
तपकिरी तुडतुडे: प्रादुर्भाव दिसल्यास इमिडाक्लोप्रीड किंवा लॅमडासाईहेलोथ्रीन फवारणी करावी.
खोडकीड व पाने गुंडाळणारी अळी / निळे भुंगेरे: नियंत्रणासाठी क्वीनालफॉस किंवा लॅमडासाईहॅलोथ्रीनची शिफारस केलेल्या प्रमाणात फवारणी करावी.
शंखि गोगलगाय (नाचणी पीक): गोगलगाई नियंत्रणासाठी शेतात गिरीपुष्प किंवा कोबीच्या पानांचे ढीग ठेवावे व जमा झालेल्या गोगलगाय गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button