नगरपरिषदेसमोर विंगर उभी करून वाहतुकीला अडथळा

पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत, शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

चिपळूण, ता. १६ : चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी केल्याप्रकरणी तसेच वाहन बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत शिवीगाळ व हातवारे केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रितेश प्रकाश शिंदे (वय ३८, रा. पोलिस वसाहत, चिपळूण) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित काशिनाथ महागावकर (वय ४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागावकर याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची विंगर बस (एमएच ०३ ईएस ५४६२) नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर उभी केली होती. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांसह पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन वाहतुकीवर परिणाम झाला.

दरम्यान, शहरात गस्त घालत असलेले पोलिस कर्मचारी शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित वाहन पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी महागावकर याने शिंदे यांच्याशी धमकीच्या स्वरूपात बोलत हातवारे केले तसेच सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, चिपळूण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button