मुंबई-गोवा महामार्गावर कोंडीचा महापूर! नागोठणा उड्डाणपुलाजवळ ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा


गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास रखडला; सीएनजी पंपांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा


लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई आणि उपनगरांतून कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळपासून वाहनांची मोठी गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून, नागोठणा उड्डाणपुलाजवळ तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा तब्बल ८ ते ९ किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. अवघ्या पाच-दहा मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना पाऊण ते एक तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांचा संयम सुटत आहे.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी खासगी वाहनांनी कोकणाच्या दिशेने रवाना झाल्याने महामार्गावर वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच महामार्गावरील सीएनजी पंपांवरही वाहनांची गर्दी झाली असून, काही ठिकाणी पंपाबाहेर तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासात इंधन भरण्यासाठी थांबलेल्या गणेशभक्तांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे.

दरम्यान, मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासाला काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र असतानाच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना सलग वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक व्यवस्थापनाचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. रस्त्यावरच वाहने खोळंबल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उत्साहात घराकडे निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास सध्या मात्र महामार्गावरील कोंडीमुळे ‘सहनशक्तीची परीक्षा’ ठरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button