
तिवरे धरण दुर्घटनेनंतर विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या ३२ घरांचा शनिवारी लोकार्पण सोहोळा
तिवरे धरण दुर्घटनेनंतर विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला आता गती मिळाली असून, तिवरे येथे सिडकोने बांधलेल्या १४ आणि अलोरे येथे बांधलेल्या १८ अशा एकूण ३२ घरांचा लोकार्पण सोहोळा शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गणेशोत्सवापूर्वीच प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
२ जुलै २०२१ रोजी तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडी व परिसरातील अनेक कुटुंबांवर मोठे संकट ओढविले. या दुर्घटनेत घरे, माणसे, जनावरे तसेच कोंबड्या- कुत्र्यांसह मोठी जीवित व झाली. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्या दुर्वासह २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शासनाने ग्रामस्थाच्या नातेवाईकांचे तिवरे व अलोरे येथील शासकीय जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. एकूण ५६ घरांपैकी १४ घरे तिवरे येथे, तर ४२ घरे अलोरे येथे बांधण्यात आली आहेत. यापूर्वी सिद्धिविनायक ट्रस्ट, दादर, मुंबई यांच्या माध्यमातून २४ घरे बांधण्यात आली असून, त्यांचा लोकार्पण सोहोळा २०२२ मध्ये पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला होता.
प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ३२ घरांचा लोकार्पण सोहोळा शनिवारी होत आहे. तिवरेतील १४ घरांचा ताबा ग्रामस्थांनी समन्वयाने घेतला असून, अलोरेतील १८ घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. या टुमदार घरांचा ताबा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येत असल्याने यावर्षीचा बाप्पा पावला अशी धारणा या प्रकल्पग्रस्तांची आहे.




