
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत यंदाही ध्वनिप्रदूषण ?
पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विविध पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
आगमन आणि विसर्जन मिरवणुका तसेच मंडपांमध्ये ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी मागणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नियमांची माहिती देण्यापलीकडे प्रत्यक्ष उत्सवकाळात त्यांची अंमलबजावणी कितपत केली जाणार, हा प्रश्न यंदाही कायम आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात यंदा १ हजार ७६ सार्वजनिक गणेशमूर्ती, तर दीड लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती विराजमान होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणुका, मंडपांमधील कार्यक्रम आणि ध्वनिक्षेपकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे उत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न दरवर्षी ऐरणीवर येतो. नियम असतानाही त्यांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होते का, की सूचना देऊनच प्रशासनाची जबाबदारी संपते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही ध्वनीप्रदूषणापासून मुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार हा संविधानाच्या कलम २१ अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी दरवर्षी पुढे येतात. पुण्यात ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवल्यानंतर पुण्यातील काही नागरिकांनी एकत्र येत डीजेच्या अतिवापराविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला.
दरम्यान, यंदा विविध गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांकडे अर्ज केले असून परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवानगी देताना केवळ अर्जाची पूर्तता तपासण्याऐवजी संबंधित मंडळाकडून ध्वनीप्रदूषणाचे नियम प्रत्यक्षात पाळले जातील याची खात्री केली जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशांची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात येत आहेत. ध्वनीची निर्धारित मर्यादा ओलांडू नये, रात्रीच्या वेळेतील निर्बंधांचे पालन करावे, डीजेच्या अतिवापरावर नियंत्रण ठेवावे तसेच शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना मंडळांना देण्यात येत आहेत. मात्र, या सूचना प्रत्यक्ष उत्सवाच्या काळात किती प्रभावी ठरतात आणि नियम मोडणाऱ्यांवर किती कठोर कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर, मिरवणुकांमधील डीजेचा आवाज आणि शांतता क्षेत्रांच्या परिसरातील ध्वनिप्रदूषण या बाबींवर प्रशासनाला लक्ष ठेवावे लागणार आहे. परवानगी देताना नियमांचा आग्रह आणि उत्सवाच्या काळात त्याकडे होणारे दुर्लक्ष, अशी विसंगती यंदा तरी टाळली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये ध्वनिप्रदूषणासह विविध मुद्द्यांबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. – अशोक दुधे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे पोलीस.
- न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नियमांचे पालन होऊनच परवानग्या मिळत का, याची माहिती घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. नियमांचे उल्लंघन होऊन ध्वनिप्रदूषण होत असेल तर नागरिकही पोलिसांकडे तक्रारी देऊ शकतात. – डाॅ. महेश बेडेकर, याचिकाकर्ते.




