
मनोज जरांगे आज मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार, बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे.मुंबई आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार यापूर्वीच व्यक्त केला आहे. “सरकारकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही,” असा आरोप करत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली असून, मुंबईकडे कूच करण्याच्या नियोजनासाठी १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.आज दुपारी होणाऱ्या या बैठकीत मुंबई आंदोलनाचे स्वरूप, आंदोलनात सहभागी होणाऱ्या समाजबांधवांचे नियोजन आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वतः मुंबई आंदोलनाची तारीख आणि पुढील कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे मराठा समाजासह राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




