
विशेष सखोल पुनरीक्षण २०२६: प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नव्हे;प्रशासनाचा महत्त्वाचा खुलासा
*रत्नागिरी, दि. ११ :- सध्या राज्यात राबवल्या जात असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदारांच्या संख्येबाबत माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांमध्ये SIR च्या प्रारूप मतदार यादीत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्या गेलेल्या एकूण मतांपेक्षा कमी मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ च्या पहिल्या टप्प्यात मतदार सर्वसाधरण निवासी असल्याबद्दलच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यावर मुख्य भर देण्यात आला होता. म्हणूनच, अर्ज करताना दिलेल्या पत्त्यावर जे लोक प्रत्यक्षात राहत नाहीत, अशा लोकांचा समावेश या प्रारूप यादीत करण्यात आलेला नाही. सध्या सुरू असलेला टप्प्याअंतर्गत जे मतदार (अर्जात दिलेल्या पत्त्यावर) हजर नाहीत किंवा तिथून दुसरीकडे राहायला गेले आहेत, पण राज्याच्या हद्दीतच राहत आहेत, असे मतदार आता त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणच्या यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतात अशी संधी त्याना उपलब्ध आहे. याचप्रमाणे, मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच, 1 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची नावे नोंदवण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. याशिवाय, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या संपूर्ण पहिल्या टप्प्यादरम्यान राहत्या ठिकाणावरून दीर्घकाळ अनुपस्थित असण्यासारख्या वा इतर कारणांमुळे ज्यांची नावे यादीत समाविष्ट झालेली नसतील, ते लोकसुद्धा आता मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा सध्याचा टप्पा हा नवीन नावे नोंदवून घेण्यावरच केंद्रित आहे. याद्वारे एकही पात्र नागरिक मतदार यादीतून सुटणार नाही याची सुनिश्चिती केली जात आहे. ही संपूर्ण मोहीम नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होईल. त्यामुळे, सध्याच्या यादीची तुलना आधीच्या आकडेवारीशी करणे (जी संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अंतिम यादीवर आधारित होती) पूर्णपणे अयोग्य आणि चुकीचे ठरेल.
कोणतीही तुलना किंवा विश्लेषण करायचे असल्यास ते अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा, तोपर्यंत घाईघाईने काढलेल्या निष्कर्षांमुळे गैरसमज पसरण्याचीच शक्यता आहे. म्हणूनच, सर्व संबंधित घटक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना आमची नम्र विनंती आहे की, कोणतीही तुलना किंवा मूल्यमापन करण्यापूर्वी त्यांनी अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होण्याची वाट पाहावी असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.




