
चिपळूणमध्ये ‘ताल चक्र’ची अनोखी संगीत पर्वणी
गायन, वादन आणि कथ्थक नृत्याचा रंगणार अद्भुत संगम
चिपळूण : चिपळूणमधील संगीतप्रेमींसाठी गायन, वादन आणि कथ्थक नृत्याचा अद्भुत संगम अनुभवण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. पुनीत बालन प्रस्तुत ‘ताल चक्र’ हा आगळावेगळा सांगीतिक कार्यक्रम शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या विविध रंगांची मेजवानी असलेल्या या कार्यक्रमात गायन, वादन आणि कथ्थक नृत्य यांचा सुरेल आणि लयबद्ध संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. संगीताच्या विविध आविष्कारांतून साकार होणारा हा कार्यक्रम चिपळूणच्या सांस्कृतिक विश्वात विशेष आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमात सुरंजन खंडाळकर, अभिषेक सिनकर आणि सागर पाटोकर यांचे सादरीकरण होणार असून, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शीतल कोळवलकर आपल्या नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच, सुप्रसिद्ध क्लासिकल गायक पं. आनंद भाटे आणि तबलावादन क्षेत्रातील मान्यवर कलाकार पद्मश्री विजय घाटे यांची उपस्थिती व सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.
गायनातील सुरांची माधुरी, वादनातील लयकारी आणि कथ्थक नृत्यातील भाव, ताल व अंगभूत सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम ‘ताल चक्र’च्या माध्यमातून चिपळूणकर रसिकांना अनुभवता येणार आहे. नामवंत कलाकारांचा सहभाग असल्याने संगीतप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सांगीतिक कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिकांसाठी मोफत प्रवेश पासची व्यवस्था करण्यात आली आहे. फ्री पासेससाठी योगेश कुष्टे – ९४२३२९३९५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच, मोफत प्रवेश पासेस श्री समर्थ कृपा बुक स्टॉल, भोगळे येथून प्राप्त करून घ्यावेत, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. चिपळूण व परिसरातील संगीत, शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्यप्रेमींनी या अनोख्या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




