
गणेशोत्सवासाठी कोकणात ६ हजारांहून अधिक एसटी बसेस धावणार
चिपळूणमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या शिवाजीनगर बसस्थानकातून; साडेतीनशेहून अधिक गाड्यांचे आरक्षण
चिपळूण: यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून तब्बल १५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली असून, मुंबई-पुण्यातून कोकणपट्ट्यात ६ हजारांहून अधिक एसटी बसेस धावणार आहेत. यापैकी सुमारे साडेचार हजार बसेस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात चिपळूण शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चिपळूण एसटी आगाराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या शिवाजीनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांकडून एसटीच्या आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, चिपळूण आगारातून आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता आवश्यकतेनुसार अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची तयारीही एसटी प्रशासनाने ठेवली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या स्वागतासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले असून, प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.




