
निमित्त मिळताच भारतीय भटकंतीला!
पीटीआय, नवी दिल्ली : निम्म्याहून अधिक भारतीय पर्यटनासाठी सार्वजनिक सुट्ट्या, वाढदिवस, वर्धापनदिन किंवा आयुष्यातील मोठ्या टप्प्यांची वाट न पाहता सहलीचे बेत आखत आहेत. तणावग्रस्त मन:स्थिती, छोटी-मोठी यशप्राप्ती आणि विश्रांतीची गरज ही आता पर्यटनासाठी नवे निमित्त ठरत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
‘समर ट्रॅव्हल रिसर्च २०२६’ या अभ्यासात असे दिसून आले की, ५८ टक्के भारतीय पर्यटकांनी फक्त ‘प्रवास करायचा आहे’ म्हणून सहल काढली, तर ५७ टक्के लोकांनी कोणत्याही निमित्ताविना गेल्या वर्षात दोन ते तीन वेळा अशा सहली केल्या. हे सर्वेक्षण ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी ‘बुकिंग डॉट कॉम’ने केले होते, तर ‘युगोव्ह’ या ऑनलाइन मार्केट रिसर्च संस्थेने मे महिन्यात १० शहरांमधील १८ वर्षांवरील १,००० ग्राहकांमध्ये हे सर्वेक्षण केले.
‘वैयक्तिक यश साजरे करण्यापासून ते हवापालटासाठी, सहलीचे बेत आखले जात आहेत. प्रवासाची इच्छा झाल्यावर कोणत्याही कारणाची गरज नसते. फक्त मनात आले म्हणून प्रवास केला’ हेच कारण असल्याचे अभ्यासात नमूद केले आहे. ६१ टक्के भारतीय पर्यटकांनी शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी किंवा नोकरीतील कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी सहलीचा बेत आखला, तर ५५ टक्के लोकांनी हॉटेलच्या आलीशान वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आरक्षण केले. ५७ टक्के लोकांनी स्थानिक हवामान खराब झाल्यावर हवापालटासाठी प्रवास केला.
सहलींचे अनपेक्षित बेत
- अभ्यासानुसार, २८ टक्के लोकांनी सासू-सासरे जास्त दिवस मुक्कामाला आल्यामुळे सहल आयोजित केली, तर ३० टक्के लोकांनी गृहसेवक किंवा चालक सुट्टीवर गेल्यावर बॅग भरल्या.
- सुमारे ३५ टक्के लोकांनी जोडीदाराशी भांडण किंवा ब्रेकअप झाल्यानंतर पर्यटनाचे नियोजन केले, तर ४६ टक्के लोकांनी ड्रिलिंगचा आवाज, घराचे नूतनीकरण किंवा तापदायक शेजार्यांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडणे पसंत केले.
- दूरच्या नातेवाईकांचे जेवण किंवा कौटुंबिक लग्न यांसारखे सामाजिक प्रसंग टाळण्यासाठी सहल आरक्षित केल्याचे ५० टक्के नागरिकांनी सांगितले.
- तब्बल ४८ टक्के भारतीय पर्यटकांनी मान्य केले की त्यांनी कामाच्या महत्त्वाच्या सभा किंवा कॉन्फरन्स कॉलदरम्यान सहल आरक्षित केली, तर ४५ टक्के लोकांनी काम करत असल्याचा बहाण करत विविध पर्यटन स्थळांचे फोटो पाहिल्याचे कबूल केले.
दीर्घकाळापासून प्रवास हा सण-उत्सव आणि मोठ्या टप्प्यांशी जोडलेला होता. निवांतपणा मिळावा यासाठी किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रमाला टाळण्यासाठी, पर्यटक आता बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधत आहेत.– संतोष कुमार, बुकिंग डॉट कॉम
जोडीदाराशी झालेले भांडण असो की गृहसेवकाची सुट्टी… भारतीयांना सहलींचे बेत आखण्यासाठी केवळ निमित्त लागत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.




