‘अजिबात खपवून घेणार नाही’, सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा जागेवर निर्णय, तो नेता पक्षातून निलंबित!

मुंबई : डोंबिवलीतील पालिका रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच, पालघर येथील रुग्णालयात दहीहंडीतील जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली.

या घटनेची थेट सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत तीव्र शब्दात ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान उपटले.
सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर निरीक्षण अन् एकनाथ शिंदे यांचा दणका

डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच पालघर रुग्णालयातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेला धुडगुस याचा उल्लेख न्यायालयाने केला. “कायद्याचे राज्य आहे की नाही? डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या लोकांना रस्त्यावर मोकाट फिरायला नको,” अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. पालघरमध्येही यांच्याच लोकांनी डॉक्टरांना मारहाण केली, असे न्यायालय म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिंदे सेनेची चांगलीच नाचक्की झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर तात्काळ कठोर पावले उचलली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पालघरमधील घटनेवर एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले. पालघरमध्ये रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. काहीही प्रश्न किंवा अडचण असली तरी कायदा हातात घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. कायदेशीर बाबीतून मार्ग काढायला हवा होता किंवा थेट पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती”, असे शिंदे म्हणाले.
शिवसेना पदाधिकारी राहुल घरत यांचे पक्षातून निलंबन

तसेच या घटनेत सहभागी असणारे पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी राहुल घरत यांना पक्षातून तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. अशा हिंसक आणि बेजबाबदार घटनांचे मी किंवा माझी शिवसेना अजिबात समर्थन करणार नाही. असले मारहाणीचे आणि गुंडगिरीचे प्रकार मी अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.

पालघरमध्ये नेमका काय घडला होता प्रकार?

पालघरमधील एका खासगी रुग्णालयात दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांवर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यावरून डॉक्टर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात घुसून वैद्यकीय अधिकाऱ्यांना, डॉक्टरांना शिवीगाळ केली. हा सगळा राडा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल घरत यांच्यासह १७ जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button