
दापोलीत वैद्यकीय व्यावसायिकांकडून डॉक्टर्स टास्क फोर्सची स्थापना, आरोग्यसेवा सुरक्षित आणि सुसंवादी करण्यासाठी पुढाकार
दापोलीः- दापोली तालुका आणि परिसरातील आरोग्यसेवा अधिक सुरक्षित, सुसंवादी आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने येथील वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येत डॉक्टर्स टास्क फोर्स दापोली तालुका ची स्थापना केली असून, या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. रूग्णालये, दवाखाने आणि विविध आरोग्यसेवा केंद्रांमध्ये काम करताना परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना अनेकदा गैरसमज, वादविवाद किंवा तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जावे लागते.
अशा प्रसंगी परिस्थिती अधिक न चिघळवता संवाद, समन्वय आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे, तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे, हा या टास्क फोर्सचा मुख्य उद्देश आहे. आजारी रूग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांमध्ये चिंता आणि मानसिक तणाव असणे स्वाभाविक असते, त्यामुळे त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत संवादातून गैरसमज दूर करून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यावर या टास्क फोर्सचा विशेष भर राहील. ही समिती रूग्ण किंवा नातेवाईकांच्या विरोधात नसून, रूग्णांना योग्य आरोग्यसेवा मिळावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित वातावरणात कर्तव्य बजावता यावे, या दोन्ही बाबींचा समतोल साधण्याचे काम करणार आहे. कोणत्याही प्रकारची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यास ती शांततेने हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणे, अनुचित घटना घडल्यास संबंधितांना मदत उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेनुसार पोलिस प्रशासन व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून केले जाणार आहे.
हा उपक्रम केवळ काही जणांपुरता मर्यादित नसून, यामध्ये अलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी यांसारख्या विविध उपचारपध्दतींचे व्यावसायिक, परिचारिका, प्रयोगशाळा व एक्स-रे, तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ आणि रूग्णालयातील इतर सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. या टास्क फोर्सच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या 13 वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये कोस्तुभ रानडे, संजय बागडे, संदेश लखमदे, नरेश पटवर्धन, कुणाल मेहता, सुयोग भागवत, विद्या दिवाण, विनोद जोशी, शिरीष फाटक, अनिरूध्द डोंगरे, प्रसाद करमरकर, शबनम मुकादम आणि काझिम खोत यांचा समावेश आहे. सुरक्षित आरोग्यसेवा, सक्षम आरोग्यव्यवस्था आणि सर्वांसाठी विश्वासाचे वातावरण या व्यापक उद्देशाने दापोलीतील संपूर्ण आरोग्यसेवा क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.




