नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याचा गतिमान विकास साधा; नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

धनगरवाड्यांचे महावितरणने सर्वेक्षण करण्याच्या सूचना कातळशिल्प विकासासाठी १४ कोटींचा आराखडा करण्याचे निर्देश



रत्नागिरी, दि. ४ ) : जिल्हा नियोजन समितीचा खर्च हा पूर्णपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर झाला पाहिजे. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांच्या याद्या तातडीने अंतिम कराव्यात. निविदा प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामे सुरू होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपसात उत्तम समन्वय ठेवून तात्काळ परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते. या बैठकीस आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कामकाजाची माहिती दिली.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व निर्णय :
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधीच्या मर्यादेतच अचूक प्रस्ताव सादर करावेत. ज्या धनगरवाड्यांमध्ये केवळ सिंगल फेज मीटर आहेत, तेथे थ्री-फेज मीटर बसवण्यासाठी महावितरणने जिल्ह्यातील धनगरवाड्यांचे तत्काळ सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार प्रस्ताव पाठवावेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) वाहन प्रशिक्षण केंद्र व टेस्ट ड्राईव्ह ट्रॅक उभारण्याबाबत प्रस्ताव द्यावा.
पर्यटन वाढीच्यादृष्टीने कातळशिल्प संवर्धन व विकासासाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करावा. पुरातत्व विभागाने जिल्हाधिकाऱ्यांपुढे सादरीकरण करून मान्यता घ्यावी. तसेच गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सुसज्ज फूडस्टॉल उभारण्याबाबत नियोजन करावे.
जिल्ह्यातील महिला प्रभागसंघांना शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी भाट्ये येथे सर्व सुविधांयुक्त ‘हाऊसबोट टर्मिनल’ उभारण्यात येत आहे. यामुळे स्थानिक महिला बचत गटांना अधिक उत्पन्न मिळून हाऊसबोट पर्यटन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाईल.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा ग्रंथालयात ‘एमपीएससी/यूपीएससी अभ्यास केंद्र’ सुरू करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारात जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडी बांधकामासाठी सर्व शाळांचे सर्वेक्षण करावे.
सामूहिक विवाह योजना ‘शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना’ प्रभावीपणे राबवून यावर्षी जिल्ह्यात किमान ५० जोडप्यांचे ५ सामूहिक विवाह आयोजित करावेत. यासाठी महिला व बालविकास आणि समाज कल्याण विभागाने संयुक्तपणे पुढाकार घ्यावा.
पोलीस विभागाच्या श्वान पथकासाठी वातानुकूलित (AC) वाहन उपलब्ध करून दिले जाईल. भविष्यातील १५ श्वानांची क्षमता विचारात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषधे व सर्जिकल साहित्य खरेदी, वन विभागामार्फत खैराच्या रोपांचे वाटप, शासकीय व निवासी इमारतींचे बांधकाम तसेच वन व वन्यजीव विभागाच्या मंजूर कामांचाही या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button